घरमहाराष्ट्रआयटीआयच्या विद्यार्थ्यांना आता व्हर्च्युअल प्रशिक्षण

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आता व्हर्च्युअल प्रशिक्षण

Subscribe

10 केंद्रांवर सुरू होणार शिक्षण

विद्यार्थ्यांना अचूक प्रशिक्षण मिळावे, कौशल्यक्षम कारागीर घडावेत यासाठी आयटीआयकडून विविध प्रयोग राबवण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर आयटीआयकडून आता विद्यार्थ्यांना आभासी (व्हर्च्युअल) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अचूक कौशल्य मिळेपर्यंत प्रशिक्षण देणे शक्य होणार असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. आभासी प्रशिक्षण सध्या आयटीआयच्या 10 संस्थांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना अचूक व 100 टक्के कौशल्य मिळावे यासाठी आयटीआयकडून महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार आयटीआयच्या संस्था अद्ययावत बनवण्यावर भर देण्यात येत आहे. परंतु कोणत्याही ट्रेडच्या कौशल्याचा सराव करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीमधून साधनांचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाते. परंतु यामध्ये अनेकदा साधने खराब होणे, साहित्याचा पुनर्वापर करणे, अपुर्‍या साहित्यांमुळे विद्यार्थ्यांना अचूक प्रशिक्षण मिळत नाही, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कौशल्यक्षम कारागीर घडवण्यात अनेक अडचणी येतात. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसेल तर त्यांना उत्तम काम करता येत नाही.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना अधिकाधिक व अचूक प्रशिक्षण मिळावे यासाठी राज्यातील संस्थामध्ये आभासी प्रशिक्षण देण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. आभासी प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांकडून आभासी पद्धतीने काम होणार असले तरी त्यांना प्रत्यक्ष कार्याचा करण्याचा अनुभव मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना एखादी प्रक्रिया पूर्णत: समजेपर्यंत काम करता येणार असल्याने साहित्य व साधनांचा तुटवडाही जाणवणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अचूक प्रशिक्षण मिळण्यास मदत होऊन कौशल्यक्षम कारागीर घडण्यास मदत होणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली.

विद्यार्थ्यांना आभासी प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील 10 आयटीआय संस्थांमध्ये विशेष केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यातील सहा केंद्र ही शहरामध्ये तर चार केंद्र ही ग्रामीण भागामध्ये असणार आहेत. आभासी केंद्राची उपयुक्तता लक्षात घेऊन पुढील वर्षामध्ये सीएसएसआर निधी वापरून राज्यातील 100 आयटीआय संस्थांमध्ये आभासी केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही कुशवाह यांनी दिली.

- Advertisement -

खर्च कमी होणार
सध्या वेल्डिंगचा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी लागणारी मशीन, साहित्यासाठी 15 ते 35 लाख रुपये इतका खर्च येतो. पण आभासी तंत्रज्ञानासाठी फक्त 40 हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच यामध्ये एकावेळी चार विद्यार्थी प्रशिक्षण घेणार असल्यामुळे आभासी प्रशिक्षण आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर ठरणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या ट्रेडमध्ये ते तरबेज होईपर्यंत सराव करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. प्रत्यक्ष काम करतानाच अनुभव घेता येणार असल्याने चुका सुधारण्याची संधीही त्यांना मिळणार आहे. त्यामुळे कुशल कारागीर तयार करण्यास मदत होणार आहे .
– दीपेंद्रसिंह कुशवाह, संचालक,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -