घरक्रीडामानसिक अनारोग्य मोठे आव्हान!

मानसिक अनारोग्य मोठे आव्हान!

Subscribe

 राहुल द्रविडचे मत

क्रिकेटपटूंमधील मानसिक अनारोग्य हे मोठे आव्हान असून खेळाडूंनी सर्व गोष्टींमध्ये समतोल राखणे गरजेचे असते, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असणारा द्रविड सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद भूषवत आहे. एखाद्या खेळाडूला बर्‍याच सामन्यांत संधी मिळत नाही, तेव्हा त्या खेळाडूच्या डोक्यात नकारात्मक विचार येऊ लागतात, असेही द्रविड म्हणाला.

क्रिकेटपटूंमधील मानसिक अनारोग्य हे मोठे आव्हान आहे. क्रिकेट हा तुमच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचा कस लावणारा खेळ आहे. प्रत्येक संघात जागांसाठी खूप स्पर्धा असते आणि खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो. लहान मुले आता वर्षभर क्रिकेट खेळतात. बर्‍याचदा तुम्हाला संधीसाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे तुम्हाला बराच फावला वेळ मिळतो आणि तुम्ही खूप गोष्टींचा विचार करु लागता, असे द्रविडने एका मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -

ग्लेन मॅक्सवेलमुळे क्रिकेटपटूंमधील मानसिक अनारोग्याविषयी चर्चा होत आहे. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्याच निक मॅडिंसन आणि विल पुकॉस्व्हकीने याच कारणामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला. द्रविड सध्या विविध भूमिका पार पाडताना भारताच्या युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करत आहे. सध्या प्रत्येक संघात जागा मिळवण्यासाठी खूप स्पर्धा असल्याने खेळाडूंनी स्वतःची योग्य काळजी घेतली पाहिजे, असे द्रविडला वाटते.

खेळाडूंनी मैदानात आणि मैदानाबाहेरही स्वतःची योग्य काळजी घेतली पाहिजे. मानसिक अनारोग्यासारख्या गोष्टींबाबत त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्ही खेळाडूंशी याबाबत सतत चर्चा करत असतो. खेळाडूंनी सर्व गोष्टींमध्ये समतोल राखणे गरजेचे असते. तुम्हाला यश मिळाले म्हणून तुम्ही फार खुश होता कामा नये आणि अपयश आल्यास फार निराशही होता कामा नये, असे द्रविडने नमूद केले.

- Advertisement -

भारताचे गोलंदाज युवकांसाठी प्रेरणा!

भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव यांनी मागील काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताची गोलंदाजांची फळी सध्या जगातील सर्वोत्तम म्हणून ओळखली जाते. या खेळाडूंची कामगिरी युवकांसाठी प्रेरणा ठरत आहे, असे द्रविड म्हणाला. या खेळाडूंमुळे युवकांना आपणही वेगवान गोलंदाजी करू शकतो असा विश्वास मिळत आहे, असे द्रविडला वाटते. तसेच त्याने पुढे सांगितले, आपल्याकडे कपिल देव, जवागल श्रीनाथ, झहीर खान असे महान गोलंदाज होऊन गेले आहेत. मात्र, भारताची सध्याची वेगवान गोलंदाजांची फळी ही भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फळींपैकी एक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -