घरक्रीडारामकुमार, सुमितचा दमदार खेळ; पाकविरुद्ध भारताला २-० आघाडी

रामकुमार, सुमितचा दमदार खेळ; पाकविरुद्ध भारताला २-० आघाडी

Subscribe

डेव्हिस कप टेनिस

भारताच्या बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कप लढतीची दमदार सुरुवात केली आहे. या लढतीच्या पहिल्या दिवशी रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांना आपापले सामने जिंकण्यात यश आले. रामकुमारने पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानच्या १७ वर्षीय मुहम्मद शोएबचा अवघ्या ४२ मिनिटांत ६-०, ६-० पराभव केला. त्यानंतर सुमित नागलने डेव्हिस कपमधील आपला पहिला विजय मिळवताना हुझाईफा अब्दुल रहमानवर ६-०, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. ही लढत त्रयस्थ ठिकाणी होत असल्याने पाकिस्तानच्या बर्‍याच प्रमुख खेळाडूंनी न खेळण्याचा निर्णय घेतला. या खेळाडूंची कमी पाकिस्तानला नक्कीच जाणवली.

मी या सामन्यात माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पहिल्या दिवशी २-० अशी आघाडी घेतल्याचा आनंद आहे. आता उद्या (शनिवारी) जीवन आणि लिअँडर पेसही चांगला खेळ करतील याची मला खात्री आहे. ही लढत लवकरच संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे रामकुमार म्हणाला. तसेच त्याने सामने पाहायला आलेल्या चाहत्यांचे आभारही मानले.

- Advertisement -

सुमित नागलला रहमानने दुसर्‍या सेटमध्ये काहीशी झुंज दिली. मात्र, सामना जिंकल्याचा नागलला आनंद होता. तो म्हणाला, मी सामन्याची उत्तम सुरुवात केली आणि अखेरीस दमदार खेळ केला. मी आणि रामकुमार आज खूपच जिद्दीने खेळलो. पाकिस्तानचे खेळाडू नवखे आहेत, पण त्यांनी झुंज दिली. माझ्याविरुद्ध खेळलेल्या खेळाडूत खूप प्रतिभा आहे. तो भविष्यात चांगली कामगिरी करेल. उद्याही आमचे खेळाडू असाच खेळ करतील याची मला खात्री आहे.

शनिवारी पुरुष दुहेरीत अनुभवी लिअँडर पेस आणि पदार्पण करणारा जीवन यांनी आपला सामना जिंकल्यास भारत ही लढत आपल्या खिशात टाकेल. डेव्हिस कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत सहा लढती झाल्या असून सर्व लढती भारतानेच जिंकल्या आहेत. आता यात आणखी एका विजयाची भर घालण्याची भारताला शनिवारी संधी मिळणार आहे. ही लढत जिंकणारा संघ जागतिक गट पात्रता फेरीत क्रोएशियाविरुद्ध ६-७ मार्चला खेळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -