घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र अजून कुडकुडणार; दिल्लीत बोचरी थंडी सुरू!

महाराष्ट्र अजून कुडकुडणार; दिल्लीत बोचरी थंडी सुरू!

Subscribe

लांबलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात आणि देशाच्या इतरही काही भागांमध्ये हिवाळा लांबल्याचं पाहायला मिळत होतं. आता मात्र हिवाळ्यानं देशभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात देखील गेल्या दोन दिवसांपासून गारठा वाढला असून येत्या काही दिवसांमध्ये त्यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशाच्या उत्तर भागामध्ये आणि विशेषत: दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा गारठा कमालीचा वाढला आहे. दिल्लीमध्ये तर सोमवारी गेल्या ११९ वर्षांमधलं सर्वात नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं. त्यामध्ये किमान २.२ तर कमाल ९.३ इतक्या तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातल्या या तापमानाचा देखील महाराष्ट्रात गारठा वाढण्यासाठी हातभार लागला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात थंडीचा कहर

गेला आठवडाभर राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. मुंबईसह काही भागांमध्ये तुरळक सरी देखील कोसळल्या. त्यानंतर मात्र थंडीनं आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केली. राज्यातलं वातावरण कोरडं बनू लागताच थंडी बिनबोभाटपणे राज्यात दाखल झाली. विशेषत: या कोरड्या वातावरणामुळे उत्तर भारतातल्या थंड वाऱ्यांना राज्यात दाखल व्हायला मोकळं रान मिळालं. त्यामुळे थंडीचा जोर राज्यात चांगलाच वाढला. निरभ्र वातावरणामुळे विदर्भ, मराठवाड्यात देखील थंडीनं मुक्काम ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी चंद्रपूरमध्ये राज्यातलं सर्वात कमी म्हणजेच ५.७ अंश सेल्सिअस तापमान होतं. संपूर्ण विदर्भाचा विचार करता तापमानाची सरासरी ३ ते ७ अंशांमध्ये राहिली आहे. त्याशिवाय, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे.

- Advertisement -

दिल्ली गार(गो)ठली!

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानीमध्ये थंडीनं दिल्लीकरांना गोठवलं आहे. सोमवारी दिल्लीत गेल्या ११९ वर्षांमधील डिसेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद झाली. डिसेंबर महिन्यात दिल्लीतलं सरासरी कमाल तापमान १५ ते २० अंश सेल्सिअसदरम्यान रेंगाळतं. पण सोमवारी मात्र हेच तापमान तब्बल ११ अंशांनी घटून ९ अंशांपर्यंत खाली आलं होतं. येत्या काही दिवसांमध्ये देखील ही थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -