घरक्रीडाविल्यमसनसाठी वाईट वाटले!

विल्यमसनसाठी वाईट वाटले!

Subscribe

न्यूझीलंड पराभवाबाबत कोहलीची प्रतिक्रिया

केन विल्यमसन ज्याप्रकारे खेळला ते पाहता, न्यूझीलंडने हा सामना जिंकायला पाहिजे होता, अशी कबुली भारताचा कर्णधार विराट कोहलीने तिसर्‍या टी-२० सामन्यानंतर दिली. विल्यमसनने या सामन्यात ४८ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९५ धावांची झुंजार केली केली. मात्र, न्यूझीलंडच्या डावातील अखेरच्या षटकात त्याला मोहम्मद शमीने माघारी पाठवले. त्यानंतर न्यूझीलंडला अखेरच्या ३ चेंडूंवर केवळ १ धाव करता आल्याने नियमित सामना बरोबरीत संपला. पुढे सुपर ओव्हरमध्ये भारताने हा सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी मिळवली.

न्यूझीलंडचे फलंदाज चांगला खेळ करत होते. त्यामुळे आम्ही हा सामना गमावणार असे मला एका वेळी वाटले होते. मी तसे आमच्या प्रशिक्षकांना सांगितले. केन (विल्यमसन) ज्याप्रकारे खेळला ते पाहता, न्यूझीलंडने हा सामना जिंकायला पाहिजे होता. त्याने ९५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. मला त्याच्यासाठी वाईट वाटत आहे. तुम्ही चांगली खेळी केल्यानंतरही संघ जिंकला नाही, तर कसे वाटते हे मला ठाऊक आहे, असे कोहलीने सांगितले.

- Advertisement -

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने नियमित सामन्यात ६५ धावा केल्या, तर त्यानेच सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या २ चेंडूंवर षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला. त्याची स्तुती करताना कोहली म्हणाला, रोहितने आमच्या दोन्ही डावांत अप्रतिम फलंदाजी केली. अखेरच्या दोन चेंडूंवर आम्हाला १० धावांची गरज होती. मात्र, रोहितने एक षटकार मारला, तर गोलंदाजावर दबाव येईल हे आम्हाला माहित होते आणि तसेच झाले.

सुपर ओव्हरमध्ये गोंधळलो – रोहित

भारताची टी-२० क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर खेळण्याची पहिलीच वेळ होती. तर भारताचा सलामीवीर रोहित शर्मानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच आयपीएल किंवा स्थानिक क्रिकेटमध्येही सुपर ओव्हरमध्ये याआधी फलंदाजी केली नव्हती. त्यामुळे यात नक्की काय करायचे यावरून मी थोडा गोंधळालो होतो, असे रोहितने नमूद केले. मी सुपर ओव्हरमध्ये याआधी फलंदाजी केलेली नव्हती. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करायची की आधी एक-दोन धावा काढून तिसर्‍या-चौथ्या चेंडूपासून गोलंदाजांवर दबाव टाकायचा, यावरून मी थोडा गोंधळालो होतो. अखेर मी गोलंदाजाने चुका करण्याची वाट पाहिली, असे रोहित म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -