घरCORONA UPDATEपरदेशातून आलेल्या मुलीच्या संपर्कातील डॉक्टरने तपासले ४०७ बालकांना

परदेशातून आलेल्या मुलीच्या संपर्कातील डॉक्टरने तपासले ४०७ बालकांना

Subscribe

मुलगी परदेशातून आल्यानंतर ती माहिती दडवून ठेवणारे डॉ. महेश मोहिते यांनी मुलीच्या संपर्कात आल्यानंतरही बेजबाबदारपणे पंधरा दिवसात तब्बल ४०७ बालकांची तपासणी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुलगी परदेशातून आल्यानंतर ती माहिती दडवून ठेवणारे डॉ. महेश मोहिते यांनी मुलीच्या संपर्कात आल्यानंतरही बेजबाबदारपणे पंधरा दिवसात तब्बल ४०७ बालकांची तपासणी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये केली. नवीन पनवेल येथील सेक्टर १९ मध्ये डॉ. महेश मोहिते यांचे हॉस्पिटल आहे. त्यांची मुलगी स्वरा मोहिते परदेशातून आल्यानंतर तिच्या संपर्कात राहूनही डॉक्टरांनी ही माहिती महापालिका प्रशासनाकडून लपवून ठेवली. विशेष म्हणजे डॉ. मोहिते यांनी महापालिकेकडे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, अशी माहिती द्यावी लागते, हे माहित नव्हते. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या अधर्वट समर्थक डॉक्टरांनीही त्यांची ‘री’ ओढत अतिशय बालिशपणे सगळीकडे हे पसरवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

डॉक्टरने लपवली माहिती 

डॉ. मोहिते आणि समर्थकांचा हा हास्यास्पद प्रयत्न त्यांच्या अंगलट आला असून डॉ. मोहिते चांगलेच अडचणीत आले आहेत. महापालिकेच्या उच्च पदस्थ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी डॉक्टरांची बैठक बोलावून ओपीडी सुरू करण्यासाठी दिलेल्या सुचनांच्या वेळी, डॉक्टरांच्या नातेवाईकांपैकी कुणीही परदेशातून आले असल्यास महापालिकेला कळवावे, असे स्पष्ट सांगितले होते. त्या बैठकीला डॉ. महेश मोहिते उपस्थित होते आणि त्यांची स्वाक्षरीसुद्धा महापालिकेच्या इतिवृत्तात असल्याची पृष्ठी त्या अधिकार्‍यांनी दिली. तरीही मोहिते आणि समर्थक डॉक्टर त्यांना वाचवण्याचा बालहट्ट का करत आहेत, याची चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे महापालिकेला विमानतळ प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार स्वरा मोहिते यांचे नाव आणि पत्ता समजल्यावर त्यांच्या संपर्क क्रमांकावर महापालिकेतील कर्मचार्‍यांनी तीन-चार वेळा फोन केला. परंतु, त्या क्रमांकावरून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने उपायुक्त संजय शिंदे यांना कर्मचार्‍यांनी ही माहिती दिली. तेव्हा त्यांनी त्या मोबाईलवरून संपर्क साधला असता, तो डॉ. महेश मोहिते यांचा असल्याचे कळले. तरीही डॉक्टर बोलतात आम्हाला काहीच माहित नाही.

अखेर हॉस्पिटल केले बंद

महापालिकेने कठोर कारवाई करत डॉ. महेश मोहिते यांचे हॉस्पिटल बंद करण्याची कारवाई केली आहे. नोटीस पाठवली त्या दिवशीसुद्धा डॉ. मोहिते यांनी सकाळी २५ बालकांना तपासले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी त्या ४०७ बालकांच्या पालकांना सध्या काही त्रास जाणवत असल्यास पालकांनी तातडीने महापालिका किंवा उपजिल्हा रूग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार डॉ. मोहिते यांच्या हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यानंतर डॉ. महेश मोहिते यांनी बाह्यरूग्ण तपासल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक डॉक्टर आणि मोहितेसुद्धा चांगलेच कचाट्यात सापडले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Live Update: देशातला आकडा १६३७; तर ३८ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -