घरCORONA UPDATECorona: पीपीईअभावी आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावर

Corona: पीपीईअभावी आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावर

Subscribe

आरोग्य केंद्रातील डॉक्टर्सकडून १६ ते २० तासांची सेवा घेतानाच ना त्यांना पीपीई किट दिले जात आहे ना पोषक आहार. त्यामुळे संशयित रुग्णांचा शोध घेणारी ही यंत्रणाच कोलमडून पडण्याची भीती वर्तवली जात आहे.

मुंबईत एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या रुग्णांची सुश्रुषा करणाऱ्या डॉक्टर्ससह नर्सेसनाही याची बाधा होवू लागली आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची विशेष काळजी महापालिका प्रशासन घेत असली तरी कोरोनाग्रस्तांच्या घरात आणि आसपास कोरोनाग्रस्तांचा शोध घेणाऱ्या डॉक्टर्ससह नर्स आणि आरोग्य सेविकांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. आरोग्य केंद्रातील डॉक्टर्सकडून १६ ते २० तासांची सेवा घेतानाच ना त्यांना पीपीई किट दिले जात आहे ना पोषक आहार. त्यामुळे संशयित रुग्णांचा शोध घेणारी ही यंत्रणाच ऐन युध्दाच्या प्रसंगी कोलमडून पडण्याची भीती वर्तवली जात आहे.

आरोग्य केंद्र असे काम करते 

मुंबईत कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेच्यावतीने संबंधित इमारत, चाळी तसेच झोपडपट्टीचा परिसर सील केला जातो. त्यामुळे या विभागाला बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर या बाधित क्षेत्रातील थेट संपर्कातील लोकांना त्वरीत क्वारंटाईनमध्ये पाठवून, तेथील उर्वरीत लोकांची माहिती गोळा करून त्यांची तपासणी केली जाते. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात अशा प्रकारच्या बाधित क्षेत्रामध्ये आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर, नर्स आणि ३ ते ४ आरोग्य सेविकांची पथक पाठवले जाते.

- Advertisement -

काही नर्सना कोरोनाची लागण 

रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण असल्याने तिथे डॉक्टर्स किंवा नर्स यांची काळजी घेतली जाते. त्यांना स्वत:च्या बचावासाठी पीपीई किट दिले जाते.परंतु बाधित क्षेत्रात कोरोनाग्रस्तांच्या थेट संपर्कातील लोकांशी चर्चा करून आजूबाजूच्या लोकांची माहिती संकलित करत सर्वे करताना तिथे जाणाऱ्या या पथकातील डॉक्टरसह कुणालाही पीपीई किट दिले जात नाही. रुग्णालयामध्ये नर्सची काळजी योग्यप्रकारे घेतली जात नसल्याने त्यांना बाधा झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तोच प्रकार भविष्यात बाधित क्षेत्रात जावून कोरोनाग्रस्तांचा शोध घेणाऱ्या डॉक्टरांची होण्याची भीती वर्तवली जात आहे.

ना योग्य आहार, ना पुरेशी झोप 

बाधित क्षेत्रामध्ये जाणाऱ्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेविकांना पीपीई दिले जात नसल्याने ही भीती अधिक वर्तवली जात आहे. मात्र, डॉक्टर्स यांची व्यथा यापेक्षाही वेगळी आहे. त्यांना पीपीई किट तर द्यायला हवे. पण वैद्यकीय अधिकारी आणि विभागाच्या सहायक आयुक्तांचा आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची वेळ ही सकाळी ९ ते सायंकाळी ४ आहे. परंतु कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतर, त्याठिकाणी पाठवले जाते. त्यामुळे जोवर तेथील प्रश्न तडीस लावला जात नाही, रुग्णांना क्वारंटाईनमध्ये पाठवून तसेच इतरांची माहिती संकलित करून होम क्वारंटाईनमध्येच राहण्याच्या सूचना करून निघेपर्यंत कधी कधी रात्री २ ते ३ ही वाजतात. त्यामुळे मग ज्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाते, तिथे राहायला गेल्यानंतर तिथे जेवणही नसते. त्यामुळे पोषक आहार नाही, की पुरेशी झोप नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या आरोग्यावरच याचा अधिक परिणाम होण्याची भीती आरोग्य केंद्रातील काही डॉक्टर्सनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे 

प्रतिकारशक्ती चांगली असेल तर याचा संसर्ग होत नाही. तसेच यासाठी पुरेशी झोपही महत्वाची आहे. परंतु पोषक आहार आणि अपुऱ्या झोपेमुळे डॉक्टरसह नर्स आणि आरोग्य सेविकांचीही प्रतिकारशक्ती कमी होते. संशयित रुग्णांना थेट मैदानात उतरुन शोधून काढण्याचा प्रयत्पन करणाऱ्या डॉक्टरांच्या आरोग्याकडेच प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रातील डॉक्टरसह इतरांना २४ तासांची ड्युटी देवून एक दिवस सुटी दिली जावी. जेणेकरून सर्वांना आपले आरोग्य चांगले राखत संशयित कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याची अविरत सेवा बजावता येईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे कधी कधी संशयित कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात रुग्णवाहिकांमधून नेण्याचीही जबाबदारी याच डॉक्टरांवर असते. मात्र, रुग्णवाहिकेतून जाताना त्या डॉक्टरांना पीपीई किट उपलब्ध नसते. त्यामुळे एकप्रकारे केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे थेट बाधित क्षेत्रांमध्ये जावून काम करणाऱ्या आरोग्य केंद्रामधील डॉक्टर्स या कोरोनाचे बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वााचा –

नगरसेवक निधीतून २५ लाख रुपये वापरण्यास भाजप पाठोपाठ काँग्रेसची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -