घरCORONA UPDATEअखेर भीती खरी ठरलीच; दोन आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना ‘कोरोना’

अखेर भीती खरी ठरलीच; दोन आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना ‘कोरोना’

Subscribe

आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविकांच्या आरोग्यावर दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनामुळे ‘ई’ विभाग आणि ‘एफ दक्षिण’ विभागातील दोन आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांना ‘कोरोना कोविड १९’ची बाधा झाली.

मुंबईत कोरोनाविरोधातील प्रमुख लढ्यात जी भीती व्यक्त केली जात होती, ती अखेर ठरली. अदृश्य कोरोनाग्रस्तांशी थेट लढा देणाऱ्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविकांच्या आरोग्यावर दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनामुळे ‘ई’ विभाग आणि ‘एफ दक्षिण’ विभागातील दोन आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांना ‘कोरोना कोविड १९’ची बाधा झाली. या आरोग्य केंद्रातील दोन डॉक्टरांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अखेर या दोन्ही विभागातील आरोग्य केंद्र सिल करण्यात आली आहेत. त्यामुळे विभागांच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य केंद्रातील डॉक्टर बाधित झाले असले तरी यांच्या आरोग्याची काळजी न घेतल्यास पुढे नर्स आणि आरोग्य सेविकांसह किटक नाशक विभागातील कर्मचारीही बाधित होवून धारातिर्थ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘एफ-दक्षिण’ विभागातील राजकमल आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरची ‘कोरोना कोविड – १९’ची चाचणी १२ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांमध्ये याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु त्यानंतर १७ एप्रिलपर्यंतची याची कल्पना त्या आरोग्य केंद्रातील नर्स, आरोग्य सेविका तसेच किटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. त्यानंतर या आरोग्य केंद्रातील नर्सची चाचणी करुन हे आरोग्य केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे आरोग्य केंद्रांमधील काही अधिकारी व कर्मचारी यांनी एफ-दक्षिण विभाग कार्यालयाबाहेर जमा होवून तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी, एफ-दक्षिण विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात प्रचंड असंतोष व्यक्त केला.

- Advertisement -

 १२ एप्रिल रोजी याची चाचणी केल्यानंतर या डॉक्टरसह नर्सेस व आरोग्य सेविकांनी बाधित क्षेत्रामध्ये जावून तसेच मेडिकल शिबिरांमध्ये काम केले. परंतु आता या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे नर्सचे स्वॅब घेण्यात आल्यामुळे यासर्व टिमसोबत एफ-दक्षिण विभाग कार्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात या कालावधीत एकत्र आलेल्या शिवडी क्षयरोग रुग्णालयाजवळील आरोग्य केंद्र व अन्य एका आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स तसेच आरोग्यसेविकांच्या पायाखालील वाळूच सरकली आहे. मात्र, या डॉक्टरचा १२ एप्रिल रोजी चाचणी केल्यानंतर त्वरीत नर्स व आरोग्य सेविकांचीही चाचणी करून त्यांना अहवाल येईपर्यंत तुर्तास बाजुला केले असते तर महापालिकेच्या अन्य आरोग्य केंद्रांसह एफ-दक्षिण विभागातील कर्मचाऱ्यांना याची बाधा होण्याची शक्यता निर्माण झाली नसती, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

या आरोग्य केंद्रातील डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथील नर्सचीही चाचणी करण्यात आली. परंतु ही चाचणी ९ तासांच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आली आहे. स्वत:च्या कर्मचाऱ्यांचीही काळजी महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने योग्यप्रकारे घेतली जात नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यासर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने रविवारी ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयांमध्ये या डॉक्टरच्या संपर्कातील इतरांच्या चाचणी घेण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

याबरोबरच ई विभागातील रे रोड आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरलाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे येथील कर्मचारीही आता घाबरला आहे. आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांमधील डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य सेविकांसह किटक नाशक विभागातील कर्मचारी यांच्या आरोग्याची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नाही. कोरोनातील विरोधातील लढ्यात अग्रेसर असलेल्या या सेनानींना पीपीई किट, हातमोजे, मास्क योग्यप्रकारे पुरवले जात नाही. तसेच त्यांना पोषक आहार पुरवून त्यांची प्रतिकार शक्तीही वाढवण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे आतापर्यंत दोन आरोग्य केंद्रातील डॉक्टरना बाधा झाल्यामुळे येथील आरोग्य केंद्र बंद केली असली तरी भविष्यात यासर्व डॉक्टसरसह इतरांची विशेष काळजी न घेतल्यास अशाप्रकारे अनेक डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य सेविकांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता  महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -