घरमुंबईमुंब्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठणठणीत

मुंब्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठणठणीत

Subscribe

जिंकला करोनाविरोधातील लढा

ठाणे पोलीस दलात करोनाने प्रवेश केल्यानंतर पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते, मात्र सोमवारी ठाणे पोलीस दलाला एक दिलासा देणारी बातमी मिळाली. करोनाची बाधा झालेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. या वरिष्ठ अधिकार्‍याच्या स्वागतासाठी ठाणे पोलीस दलाचे काही अधिकारी अंधेरी येथील सेव्हन हिल्स येथे दाखल झाले होते. करोना या आजाराशी लढा देऊन पूर्णपणे बरे झालेले या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. करोना या आजारातून बरे झालेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे हे दुसरे अधिकारी आहेत.

ठाणे पोलीस दलातील ९० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना करोनाची बाधा झालेली असून त्यापैकी काही अधिकारी आणि कर्मचार्‍याचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. तर जे करोनाचे संशयित रुग्ण आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तब्बल ३५ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता.

- Advertisement -

त्यापैकी ४ जणांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले होते. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आजारपणाची सुट्टी घेऊन नाशिक येथे घरी गेले असता त्या ठिकाणी त्यांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना तात्काळ मुंबईतील अंधेरी येथे असणार्‍या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर इतर अधिकारी यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी तब्ब्ल १५ दिवस करोना आजाराशी सामना केला, रविवारी त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यात ते निगेटिव्हआले. या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या अधिकार्‍यांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी ठाणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि इतरांनी रुग्णालयाच्या आवारातच त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वीच मुंब्रा पोलीस ठाण्याचे आणखी एक अधिकारी करोना या आजारातून पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -