घरCORONA UPDATEमुंबईत कोरोना ॲन्टीजेन चाचणीचे दैनंदिन प्रमाण ५ हजारांवर पोहोचले

मुंबईत कोरोना ॲन्टीजेन चाचणीचे दैनंदिन प्रमाण ५ हजारांवर पोहोचले

Subscribe

महानगरपालिका प्रशासनाने अर्ध्या तासात निदान करु शकणारे ॲण्टीजेन टेस्ट युद्ध पातळीवर खरेदी करुन चाचण्यांना अधिक वेग दिला आहे. सुमारे १ लाख ॲन्टीजेन टेस्ट यामुळे होणार आहेत. ३ जुलै २०२० पासून ॲण्टीजेन टेस्टचा उपयोग करण्यात येत असल्याने आता दैनंदिन चाचण्यांची संख्या ही ५ हजार ५०० पर्यंत पोहोचली आहे. बुधवारी ८ जुलै २०२० दिवसभरात सुमारे ५ हजार ४८३ चाचण्या झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. काही दिवसांपूर्वी असलेली दैनंदिन सरासरी ४ हजार चाचण्यांची संख्या एवढी होती.

कोविड १९ संसर्गाच्या प्रारंभापासून अधिकाधिक चाचण्या म्हणजे खंबीरपणे संसर्गावर नियंत्रण, ही बाब केंद्रस्थानी ठेवून महानगरपालिका प्रशासनाने कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करुन प्रशासनाने चाचण्या केल्या आहेत. दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली तर ११ मार्च २०२० रोजी पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. ३ फेब्रुवारी ते ६ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर १ जून २०२० रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर २४ जून २०२० रोजी ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. बुधवारी ८ जुलै रोजी एकूण ३ लाख ६४ हजार ७५३ चाचण्या झाल्या आहेत.

- Advertisement -

चाचण्यांची संख्या वाढवताना त्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमध्येही महानगरपालिका प्रशासनाने सुयोग्य बदल केले आहेत. प्रारंभी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, वैद्यकीय प्रपत्र अर्थात प्रीस्क्रीप्शन असल्याशिवाय चाचणी करण्यास परवानगी दिली जात नव्हती. त्यामध्ये सवलती देण्यात आल्या. ई-प्रीस्क्रीप्शन व रुग्णांनी स्वघोषणा पत्र अर्थात सेल्फ डिक्लेरेशन देण्यासारखे पर्याय उपलब्ध करुन सुलभता आणली. आता तर मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच ‘प्रिस्क्रीप्शन’ शिवाय कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

देशभरात कोरोना विषाणू संक्रमणाच्या अभ्यासासाठी, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरो सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. हेच सर्वेक्षण मुंबईतही नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) आणि इतर संस्था यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहे. ही चाचणी म्‍हणजे रक्‍त नमुने संकलित करुन केली जाणारी प्रतिद्रव्‍य चाचणी अर्थात ॲण्टीबॉडीज् टेस्‍ट आहे. एम/पश्चिम, एफ/उत्तर आणि आर/उत्तर या तीन विभागांची या सर्वेक्षणासाठी निवड करण्‍यात आली असून झोपडपट्टी भागात आण‍ि झोपडपट्टी नसलेल्‍या भागातही हे सर्वेक्षण करण्‍यात येत आहे. यामध्‍ये एकूण १० हजार नमुने रँडम पद्धतीने संकलित करण्यात येत आहेत. ‘सेरो’ सर्वेक्षणाच्‍या फेऱ्या या सार्वजनिक आरोग्याच्या धोरणात्मक निर्णयांसाठी महत्‍त्‍वाच्‍या ठरणार आहेत. तसेच संक्रमणाची लागण होण्‍याचा धोका असलेल्‍या इतर आजारांबाबत किंवा विशिष्‍ट वय व लिंग अशा गटांना असलेल्‍या त्‍याच्‍या धोक्‍याबाबत माहिती देण्‍यासाठी देखील हे सर्वेक्षण महत्‍त्‍वाचे आहे. महानगरपालिका प्रशासन कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी गंभीर आणि संवेदनशील असल्यानेच तसेच नागरिकांच्या आरोग्य हितासाठीच हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -