घरताज्या घडामोडीमुंबईतील कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ६१२ आयसीयू बेड्स

मुंबईतील कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ६१२ आयसीयू बेड्स

Subscribe

महापालिकेच्यावतीने कोविड बाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरची उभारणी केली असून रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले आयसीयू बेड्स आता याठिकाणी उपलब्ध करून दिले जात आहेत. आतापर्यंत सर्व ठिकाणच्या समर्पित कोरोना केअर सेंटरमध्ये तब्बल ६१२ आयसीयूची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने रुग्णांना आता प्रमुख रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रमुख रुग्णालयांवरील भारही आता थोडासा हलका होणार आहे.

मुंबईत विविध ठिकाणी महापालिकेने कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी तात्पुरती क्षेत्रीय रुग्णालय अर्थात फिल्‍ड हॉस्पिटल उभारली आहेत. या केंद्रांमध्ये सर्वसाधारण रुग्णशय्यांसह ऑक्सिजन पुरवठा आणि अतिदक्षता उपचार (आयसीयू) कक्ष देखील आहेत. याचा परिणाम म्हणून नियमित रुग्णालयांवरील भार तर कमी होण्यास मदत होवू लागली आहे. परिणामी बाधित रुग्णांना आपापल्या भागात योग्यप्रकारे उपचार मिळू लागला आहे. आतापर्यंत वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया कोरोना उपचार केंद्रातील ५०, वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रात ११२, गोरेगांव (पूर्व) येथील नेस्को केंद्रात २५०, मुलूंड येथील केंद्रात १०० आणि दहिसर येथील केंद्रात १०० अशा ५ ठिकाणी मिळून ६१२ अतिदक्षता उपचार रुग्‍णशय्य अर्थात आयसीयू बेड उपलब्ध करून देत रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी वांद्रे-कुर्ला संकुलात, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दहिसर येथे तर सिडकोने मुलूंड येथे कोरोना आरोग्य केंद्र उभारुन मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. ही केंद्र कार्यान्वित करताना रुग्ण सेवा देण्यासाठी तज्ज्ञ अशा वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळाची कोणतीही कमतरता राहणार नाही, याची खबरदारी घेत महानगरपालिका प्रशासनाने या रुग्णालयांसाठी बाह्यसेवा तत्वावर वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करुन घेतले आहे. परिणामी नियमित रुग्णालयांसह या तात्पुरत्या क्षेत्रीय रुग्णालयांतही पुरेसे मनुष्यबळ सेवेसाठी हजर असेल.

संबंधित ५ भव्य कोरोना आरोग्य केंद्रांतील आयसीयू बेडस्‌वर रुग्णसेवा करण्यासाठी, आयसीयू व्यवस्थापन करण्याचा तज्ज्ञ अनुभव असलेल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल, वैद्यकीय संस्था व व्यावसायिक, खासगी कंपन्या, भागीदारी संस्था, बिगर शासकीय संस्था, विश्वस्त संस्था यांच्याकडून महानगरपालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्याची आवश्यक ती सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन मनुष्यबळ नियुक्त करण्याची कार्यवाही आता पूर्ण करण्यात आली आहे.

- Advertisement -

दहा खाटांच्या आयसीयू बेडसाठी डॉक्टर

१ वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार (सीनियर कन्सल्टंट),

६ सहाय्यक वैद्यकीय सल्लागार (असोसिएट कन्सल्टंट),

६ निवासी वैद्यकीय अधिकारी (रेसिडंट मेडिकल ऑफिसर्स),

१० परिचारिका (नर्सेस),

७ सहाय्यक (मल्टी पर्पज वर्कर्स),

२ तंत्रज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -