घरक्रीडाआयपीएल अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला?

आयपीएल अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला?

Subscribe

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक २ ऑगस्टला होणार आहे आणि यात विविध मुद्यांवर चर्चा होईल.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) या जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेबाबत मागील काही काळात बरीच चर्चा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयला यंदाचा आयपीएल मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला होता. परंतु, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडल्याने आता बीसीसीआयसाठी आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाची स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल, असे काही दिवसांपूर्वी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले होते. मात्र, आता या स्पर्धेचा अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

दिवाळीमध्ये अधिक जाहिराती मिळण्याची शक्यता

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक २ ऑगस्टला होणार आहे आणि यात विविध मुद्यांवर चर्चा होईल. स्पर्धेचे वेळापत्रकही याच बैठकीत ठरणार असून अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला घेण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना दोन दिवस पुढे ढकलल्यामुळे या स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीला दिवाळी आठवड्याचा अधिक उपयोग करून घेता येऊ शकेल. दिवाळीमध्ये अधिक जाहिराती मिळण्याची शक्यता असल्याने आयपीएल स्पर्धा १४ नोव्हेंबरपर्यंत चालावी असे प्रसारण करणाऱ्या वाहिनीचे म्हणणे होते. परंतु, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होत असल्याने बीसीसीआयने आयपीएलच्या अंतिम सामन्याची तारीख ८ नोव्हेंबर ठरवली होती. मात्र, आता प्रसारण करणाऱ्या वाहिनीला अधिक फायदा व्हावा यासाठी त्यांनी अंतिम सामना दोन दिवस पुढे ढकलण्याची तयारी दर्शवली आहे. तसे झाल्यास भारतीय संघाला मायदेशी न परतता, थेट युएईहून ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावे लागेल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -