घरमतप्रवाहभाग २० - कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे पवार साहेब

भाग २० – कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे पवार साहेब

Subscribe

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी "साहेब माझा विठ्ठल" या सदराखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक, राजकीय जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या घटनांवर आधारीत लेख लिहिले आहेत. त्या ३० लेखांची ही मालिका.

कबड्डी हा आपल्या मातीतला अतिशय रांगडा आणि लोकप्रिय खेळ. देशभरात हा खेळ वेगवेगळ्या नावाने खेळला जातो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये तो ‘हुतुतू’ या नावाने ओळखला जातो. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये ‘चेडू-गुडू’ असे त्याचे नामकरण होते, केरळात ‘वांडीकली’ तर पंजाबमध्ये ‘जबर गणना’ बनतो, बंगालमध्ये तो ‘हाडूडू’ असतो तर उत्तर भारतात ‘कबड्डी’ या नावाने हा खेळ ओळखला जातो. थोडक्यात अस्सल भारतीय मातीतला हा खेळ देशभरात लोकप्रिय तर आहेच सोबतच त्याला मोठा इतिहास आहे.

१९३८ पासून देशभरात या खेळाचे राष्ट्रीय पातळीवर विविध ठिकाणी आयोजन करण्यात येऊ लागले. या खेळाच्या उत्कर्षासाठी त्याकाळी अनेक माणसे झटत होती, प्रयत्न करत होती. यामध्ये शंकरराव साळवी, भाई नेरुळकर आणि या सारख्या अनेक सन्माननीय लोकांचा समावेश होता. या लोकांच्या अथक प्रयत्नामुळे आणि कष्टामुळे कबड्डी हा खेळ राष्ट्रीय पातळीवर टिकू शकला, असे म्हटले तरी ते वावग ठरणार नाही.

- Advertisement -

पुढे चालून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर १९६० साली महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना उदयास आली. या संघटनेचे देखील या खेळाच्या विकासात मोठे योगदान राहील आहे, हे इथे महत्वाचे. थोडक्यात १९३८ साली लावलेले एक छोटस रोपट १९६० पर्यंत राष्ट्रीय पातळीवर चांगलंच बहरले होते.

आता या खेळाच्या विकासासाठी झटणाऱ्या लोकांना ओढ लागली होती ती कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची, आणि यासाठी झटत होते अनेक नामवंत मंडळी. यात कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांचे नाव घेणे हे क्रमप्राप्त आहे. कारण साळवी बुवांनी आपले अवघे आयुष्य कबड्डीसाठी वाहून घेतले होते. साळवी बुवांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची कल्पना पवार साहेबांकडे मांडली. पवार साहेबांनी देखील लगोलग यावर गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली.

- Advertisement -

पुढे २९७३ साली पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली “अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया” या संघटनेची स्थापना करण्यात आली. पुढे १९७८ साली पवार साहेबांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी “एशियन अमेचर कबड्डी असोसिएशन” ची स्थापना केली. या संघटनेचा उद्देश आशियाई देशात कबड्डीचा प्रचार प्रसार करण्याचा होता.

आशियाई स्पर्धेत एखादा नवा खेळ खेळवायचा असेल, त्याचा समावेश करावयाचा असेल तर किमान ५ देशात हा खेळ खेळला जायला हवा, असा नियम आहे. आशियाई देशातील चीन आणि जपान या देशासोबत कबड्डी खेळली जावी हा कबड्डी महर्षी बुवा साळवी यांचा आग्रह होता. त्यांनी ती भूमिका पवार साहेबांकडे मांडली.

पवार साहेबांनी यासाठी मग प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांनी आपला संघ जपानला पाठवला. यामुळे जपान मध्ये देखील हा खेळ माहिती झाला. तेथील लोकांना तो आवडला. तिकडे हा खेळ रुजण्यास सुरुवात झाली. जपान्यांनी भारतीय प्रशिक्षक तिकडे बोलवण्यास सुरुवात केली. हाच प्रकार चिनसोबत देखील घडला. त्यांनी हा भारतीय प्रशिक्षक चीनला बोलवण्यास सुरुवात केली.

पुढे चालून १९८२ साली आशियाई स्पर्धेत कबड्डीचा पहिला प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला आणि १९९० साली कबड्डीला आशियाई स्पर्धेत सामावून घेण्यात आले.

अनेक मान्यवर मंडळींची अनेक वर्षांची अथक मेहनत आणि त्याला पवार साहेबांनी दिलेली अनमोल साथ यामुळे कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. मातीतली कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू लागली.

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -