घरमुंबई'तात्काळ मंदिरं उघडा नाहीतर टाळे तोडू', विश्व हिंदू परिषदेचा इशारा!

‘तात्काळ मंदिरं उघडा नाहीतर टाळे तोडू’, विश्व हिंदू परिषदेचा इशारा!

Subscribe

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामध्ये इतर सर्व गोष्टींसोबतच राज्यातली मंदिरं देखील बंद करण्यात आली होती. मात्र. आता अनलॉक आणि मिशन बिगीन अगेनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या असल्या, तरी राज्यातली मंदिरं मात्र अजूनही बंदच आहेत. यामुळे मंदिरं देखील सुरू करण्यात यावी अशी मागणी अनेक संस्था, संघटना आणि काही राजकीय पक्षांकडून देखील केली जात आहे. राज्यात आता व्यायामशाळा, जिम, बगीचे, एसटी, रेल्वे अशा सर्व सुविधा काही नियमांच्या अटींवर सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसारच, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मंदिरं सुरू करण्यात परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, तात्काळ मंदिरं सुरू नाही केली, तर टाळे तोडून मंदिरात प्रवेश करू, असा इशारा आता विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे. या मागणीसाठी मुंबईतल्या तीन प्रमुख मंदिरांसमोर येत्या २४ ऑक्टोबर रोजी आंदोलन देखील करण्यात येणार आहे.

मुंबईतल्या ३ मंदिरांसमोर आंदोलन

विश्व हिदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी मुंबईच्या विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत आणि मुंबई विभाग यांच्यावतीने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेमध्ये हा इशारा देण्यात आला आहे. ‘सरकारने मॉल-हॉटेल, दारूची दुकाने त्याप्रमाणे लोकल ट्रेन देखील महिलांसाठी सुरू केलेली आहे. याच धर्तीवर राज्यभरातील मंदिरे तात्काळ उघडा, अन्यथा आम्ही मंदिरांची दारे तोडून आत प्रवेश करू’, असं श्रीराज नायर यावेळी म्हणाले. ही मागणी मांडण्यासाठी येत्या २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मुबईतील महेश्वरी मंदिर असल्फा व्हिलेज मेट्रो स्टेशन, अंबा माता मंदिर गोरेगाव स्टेशन आणि मुंबादेवी मंदिर भुलेश्वर या तीन मंदिरांसमोर आंदोलन करण्यात येईल, असं देखील ते म्हणाले. अशाच प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

तर दारं तोडून आत प्रवेश

‘गेल्या ६ महिन्यांपासून आपण कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहोत. सरकारच्या सर्व आदेशाचं पालन करत आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक संस्था आणि मंदिरांच्या ट्रस्टनी मंदिरं बंद ठेवली. पण आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात मॉल, हॉटेल, बार, मेट्रो, लोकल देखील सुरू झाली आहे. मात्र, आंदोलनानंतरही मंदिरं उघडण्याचा निर्णय न घेतल्यास थेट टाळे तोडून मंदिरांमध्ये प्रवेश करण्याचं व्यापक आंदोलन केलं जाईल, असा इशारा देखील यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -