घरताज्या घडामोडी'वाजवूया बँड बाजा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘वाजवूया बँड बाजा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे सावट कोसळल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. मात्र सरकारच्या नियमावलींचे पालन करत आता चित्रपटसृष्टीतले काम सुरळीत मार्गाने सुरू असल्याचे समोर आले आहे. अशातच सरकारने चित्रपटगृहांना मान्यता दिल्याने एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘वाजवुया बँड बाजा’ या बहुचर्चित चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू असताना प्रेक्षकांकरिता हा चित्रपट येण्यास सज्ज झाला आहे. हास्याचा विस्फोट घडविणाऱ्या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनात असलेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, याचे कारण म्हणजे चित्रपटातील गाणी. लॉकडाऊन आधी या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना ठेकाच धरायला लावला होता. आता पुन्हा एकदा ही गाणी या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती-जमतींवर आधारलेली ‘वाजवुया बँड बाजा’ची गमतीदार कथा संजीव तिवारी लिखित असून प्रसंगानुरूप हास्याची कारंजे उडवणारी पटकथा तसेच संवाद निशांत नाथराम धापसे लिखित आहेत. या चित्रपटात समीर धर्माधिकारी, मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर, प्रीतम कागणे, कांचन पगारे, नागेश भोसले, अभिजीत चव्हाण, रुचिरा घोरमोरे, आश्विनी खैरनार, भाग्यश्री देसाई, विशविजय.जी, महेंद्र तिसगे, कपिल गुडसरकर, सुधाकर बिराजदार, अमीर तडवळकर या कलाकारांनी आपल्या कलेची उत्तम मांडणी आपल्या भूमिकांमधून साकारली. या चित्रपटामधून निसर्गरम्य असा कॅनव्हास चितारण्याचे काम छायाचित्रकार नागराज दिवाकर यांनी केले आहे. विजय गटलेवार आणि राहुल मिश्रा यांच्या संगीत लहरींवर गायक आदर्श शिंदे, विजय गटलेवार, सुवर्णा तिवारी, राहुल मिश्रा यांच्या स्वरांनी तर चारचाँदच लावलेत. संकलन निलेश गावंड आणि कलादिग्दर्शक संतोष समुद्रे अशी इतर श्रेयनामावली आहे. तर या चित्रपटाच्या वितरणात ‘पिकल एंटरटेनमेंट’चा खारीचा वाटा आहे.

- Advertisement -

तरुणांना आकर्षित करणारा ‘वाजवूया बँड बाजा’चा विषय प्रत्येक वयोगटातील तरुण मंडळींना आवडेल असा असून मनाने तरुण असणाऱ्यांना आपल्या गतकाळातील प्रेमाची तर युवा पिढीला आपल्या करंट अफेअरच्या आठवणीत रमायला भाग पाडेल, अशी या चित्रपटाची विनोदी आणि सारांश असलेली कथा आणि त्यातील ठेका धरायला लावणारी गाणी नक्कीच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतील. चित्रपटाचा ट्रेलर आणि लॉकडाऊननंतर हवेहवेसे असणारे मनोरंजन नक्कीच ‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करेल यांत शंकाच नाही. येत्या ११ डिसेंबर २०२० ला हा चित्रपट हास्यकल्लोळासहित सर्वत्र महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -