घरक्रीडाIND vs AUS 1st test : भारताचा डाव गडगडला; पहिल्या दिवसअखेर ६...

IND vs AUS 1st test : भारताचा डाव गडगडला; पहिल्या दिवसअखेर ६ बाद २३३ 

Subscribe

३ बाद १८८ वरून भारताची ६ बाद २०६ अशी अवस्था झाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध डे-कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा डाव गडगडला. ‘डे-नाईट कसोटीत तिसरे सत्र सर्वात आव्हानात्मक असते. लाईट सुरु झाल्यावर ४०-५० मिनिटे गुलाबी चेंडू खूप स्विंग होतो,’ असे काही दिवसांपूर्वी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला होता. अ‍ॅडलेड येथे होत असलेल्या डे-नाईट कसोटीत रहाणेच्या म्हणण्यानुसार तिसऱ्या सत्रात चेंडू स्विंग झाला आणि भारताने झटपट तीन विकेट गमावल्या. त्यामुळे ३ बाद १८८ वरून भारताची ६ बाद २०६ अशी अवस्था झाली. यानंतर वृद्धिमान साहा आणि अश्विन खेळपट्टीवर टिकल्याने भारताची पहिल्या दिवसअखेर ६ बाद २३३ अशी धावसंख्या होती.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मागील काही काळात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सलामीवीर पृथ्वी शॉला भारतीय संघाने या कसोटीतही संधी दिली. मात्र, तो सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतला. मिचेल स्टार्कने त्याला खातेही उघडू दिले नाही. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ५०० हूनही अधिक धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात संयमाने फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सतावले. त्याला सुरुवातीला मयांक अगरवालची चांगली साथ लाभली. मात्र, पॅट कमिन्सने उत्कृष्ट चेंडू टाकत मयांकचा १७ धावांवर त्रिफळा उडवला.

- Advertisement -

पुजाराने मात्र संयमी फलंदाजी सुरु ठेवत कोहलीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. अखेर ऑफस्पिनर नेथन लायनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने १६० चेंडू खेळून काढत ४३ धावा केल्या. पुजारा बाद झाल्यावर कोहली आणि रहाणे या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीने भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ८८ धावांची भागीदारी रचली. दरम्यान कोहलीने १२३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, ७४ धावांवर तो धावचीत झाला. यानंतर स्टार्कने रहाणेला (४२), तर हेझलवूडने हनुमा विहारीला (१६) पायचीत पकडले. पहिल्या दिवशी स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक २ विकेट घेतल्या.


संक्षिप्त धावफलक – भारत : पहिला डाव ८९ षटकांत ६ बाद २३३ (विराट कोहली ७४, चेतेश्वर पुजारा ४३, अजिंक्य रहाणे ४२; मिचेल स्टार्क २/४९, पॅट कमिन्स १/४२) विरुद्ध ऑस्ट्रेलिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -