घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशस्त्रक्रियांच्या टार्गेटसाठी आरोग्य केंद्रातच स्तनदा मातांचे हाल

शस्त्रक्रियांच्या टार्गेटसाठी आरोग्य केंद्रातच स्तनदा मातांचे हाल

Subscribe

जिल्हा परिषद सदस्या माळेकरांसह सभापतींची आरोग्य केंद्राला मध्यरात्री भेट

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य केंद्रानेच स्तनदा मातांचे आरोग्य धोक्यात आणल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात उघडकीस आली. हरसूल जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर व सभापती मोतीराम दिवे यांनी बुधवारी (दि. २०) मध्यरात्री अचानक दिलेल्या भेटीत हा प्रकार पुढे आला.

कोरोना लॉकडाऊनदरम्यान आरोग्य केंद्रांमध्ये महिलांवरील कुटुंब नियोजन शस्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडाऊन शिथिल होताच तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांत शस्रक्रिया सुरु झाल्या. मात्र, शासनाने सांगितलेल्या नियमांना डावलून शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांवर स्तनदा मातांना शस्रक्रियेच्या नावाखाली वेठीस धरण्याचा प्रकार घडला. रुपांजली माळेकर व सभापती दिवे यांच्याकडे याबाबत तक्रारी जाताच त्यांनी सत्यता पडताळण्यासाठी दोन्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यात शिरसगाव आरोग्य केंद्रात २५ बाय २५ फुटाच्या खोलीत, वॉर्डात कोणत्याही प्रकारे निर्जंतुकीकरण न करताच या महिला रुग्णांना खोलीत झोपवण्यात आले होते. शिरसगाव आरोग्य केंद्रास १५० महिला कुटुंब नियोजन टार्गेट असताना, टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी क्षमतेच्या दुप्पट शस्त्रक्रिया करून स्तनदा मातांच्या जीवाशी खेळत असल्याचे यातून पुढे आले.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यात नसबंदी शस्रक्रियेसाठी एकच वैद्यकीय अधिकारी आहे. संबंधित अधिकारी शस्रक्रिया करून गेल्यानंतर महिलांना चार दिवस याच ठिकाणी थांबण्यास सांगितले जाते. मात्र, उपलब्ध क्षमतेच्या अधिक प्रमाणात महिला असल्याने कोरोनाच्या सर्व नियमांना तिलांजली देत, कोणतेही नियम न पाळता त्यांना एकाच खोलीत दाटीवाटीने झोपवण्यात आले होते. तर, त्यांच्यासोबत असलेले लहान बालक व नातेवाईक बाहेर व्हरांड्यातच झोपलेले होते. स्तनदा मातांना पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था नव्हती. या प्रकाराला दोषी असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी माळेकर व दिवे यांनी केली. यावेळी विनायक माळेकर, समाधान बोडके, मिथुन राऊत, हिरामण गावित, राहुल शार्दुल , चंदर शेवरे, उत्तम शेवरे,वामन शेवरे,विलास शेवरे, सुभाष मौळे, उत्तम मौळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्लँकेट्ससह पाण्याचे वाटप

स्तनदा मातांना थंडीचे दिवस असतानाही जमिनीवर झोपण्यात आलेले होते. हे पाहून माळेकर यांनी तातडीने ५० ब्लँकेट्सची व्यवस्था केली. तसेच, पाणी आणि बिस्कीट्सचेही वाटप केले. यापुढे केवळ क्षमतेनुसारच मातांवर शस्त्रक्रिया कराव्यात. जीवाशी खेळू नये, अशी प्रतिक्रिया माळेकर यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -