घरमहाराष्ट्रअखेर संजय राठोड यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

अखेर संजय राठोड यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Subscribe

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड यांची पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यावेळी संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड यांची पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विरोध केला. राठोड यांनी पोहरादेवीच्या महंतांशी बोलण्याची विनंती केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी चर्चेला नकार दिला. मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती, असे सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड यांनी आपला राजीनामा सादर केला. संजय राठोड यांनी सपत्निक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. पूजा चव्हाण प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे राठोड हे पत्नीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? अशी शक्यताही वर्तवली जात होती.

निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला

संजय राठोड यांची मीडियाला प्रतिक्रिया

- Advertisement -

आमदारकीचा राजीनामा दिला नाही, फक्त मंत्रिपद सोडले, असे शिवसेना नेते संजय राठोड यांनी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नि:ष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे, परंतु विरोधी पक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे पदावरून पायउतार झाल्याचे संजय राठोड यांनी स्पष्ट केले. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

संजय राठोड काय म्हणाले?
मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मीडियातून माझ्या समाजाची, माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार घडला. गेली तीस वर्षे मी केलेलं राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावे, ही माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगून मी राजीनामा दिला अशी पहिली प्रतिक्रिया संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर दिली.

आमदारकीचा राजीनामा नाही
माझ्यासोबत अनिल परब, अनिल देसाई होते. मी सध्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारकीचा राजीनामा दिला नाही. चौकशीनंतर परिणाम भोगायला पाहिजे होते, परंतु विरोधकांनी उद्या अधिवेशन चालू देणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, परंतु विरोधी पक्षांनी संसदीय कार्य चालू देणार नाही, असे म्हटले, म्हणून पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला, असेही संजय राठोड यांनी सांगितले.

राठोड यांच्यावर एफआयआर दाखल व्हायला हवा –फडणवीस

ज्या प्रकारचे पुरावे आहेत ते पाहता वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदावर राहणे हे चूक होते. मात्र, आपल्याला वरिष्ठांचा आशिर्वाद आहे हे माहीत असल्याने आणि तसेच असल्याने राठोड यांनी आतापर्यंत राजीनामा दिला नव्हता असे नमूद करतानाच राठोड यांच्यावर आता एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून विरोधी पक्षांची या प्रकरणी काय भूमिका असेल हे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सूचित केले आहे. हा उशिरा आलेला राजीनामा आहे. मात्र या प्रकरणात संजय राठोड यांना वाचवण्याचा सर्व प्रयत्न झालेला आहे. सर्वांच्या दबावामुळे सरकारला उपाय उरला नसल्याने हा राजीनामा घेतला गेला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आज २० दिवसांचा कालावधी लोटला. त्यानंतर आता संजय राठोड राजीनामा देत आहेत. याचाच अर्थ त्यांना सरकारचा आशीर्वाद होता. भाजपच्या महिला आघाडीचे आंदोलन, मीडियाचा दबाव नसता तर सरकारने संजय राठोड यांना वाचवलेच असते, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला आज २० दिवस झाले. या प्रकरणी संजय राठोड यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत. असे असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर २० दिवसांनंतरही एफआयआर दाखल केलेला नाही. यामुळे प्रथम संजय राठोड यांना पाठिशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

जो पर्यंत पूजा चव्हाणच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -