मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये आले असता त्यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एक पाकिटमार घुसल्याने स्वागत सोहळ्यात एकच खळबळ उडाली. नाशिकरोड येथील गोकुळ पवार यांचे पाकिट मारणार्या भामट्याला कार्यकर्त्यांनी ताबडतोब पकडले. या चोरट्याला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजकीय प्रतिष्ठित व्यक्तिंच्या भरगच्च कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा नेहमीच राबता असतो. परंतु, कार्यकर्त्यांच्या या गर्दीत कधी कोण घुसेल, याचा काही नेम नाही! शुक्रवारी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एक चोरटा घुसला. त्याने गोकुळ पवार यांच्या खिशातून पाकिट मारले. त्यात 7 हजार रुपये होते. त्यापैकी 5 हजार रुपये काढून घेत दोन हजार रुपये पुन्हा पाकिटात ठेवून दिले. मात्र, आपले पाकिट चोरीला गेल्याचे लक्षात येताच पवार यांनी आपल्या सहकार्यांना याविषयी माहिती दिली. त्यांनीही तातडीने सूत्र फिरवत या चोरट्याचा शोध घेतला. त्याला थोडा ‘प्रसाद’ देवून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
…
संशयीताला आम्ही ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करत आहोत. सध्यातरी त्याच्याकडे चोरीचा कोणताही मुद्देमाल सापडलेला नाही.
-नीलेश मैंदकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (इंदिरा नगर)