घरमुंबईकाँग्रेसच्या भारत बंदमध्ये मनसे होणार सहभागी

काँग्रेसच्या भारत बंदमध्ये मनसे होणार सहभागी

Subscribe

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. इतर पक्षांपाठोपाठ या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले इंधनाचे दर, वाढलेली महागाई याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी म्हणजे १० सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसच्या या भारत बंदला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सर्मथन दिले आहेत. मनसे देखील या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे पत्रक राज ठाकरे यांनी काढले असून, त्यांनी ते पत्रक ट्विट देखील केले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष या पक्षांसोबत मनसेने देखील भारत बंदमध्ये सहभागी झाली आहे. केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेना आणि मनसेनेही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन निरुपम आणि नवाब मलिक यांनी केले होते. शिवसेनेने बंदमध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण त्या पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहेत, अशी माहिती निरुपम यांनी दिली होती.

MNS Letter
मनसेचे प्रसिध्द पत्रक

काय म्हणालेत राज ठाकरे पत्रात 

पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला भिडलेत. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य होरपळून निघतंय. या विरोधात देशभरातील तमाम राजकीय पक्षांनी सोमवारी १० सप्टेंबरला भारत बंद पुकारला आहे. या भारत बंदला मनसेचा पाठिंबा आहे, इतकंच नाही तर मनसे देखील यामध्ये सक्रिय सहभागी असेल. इंधनाचे दर हे जागतिक बाजारपेठेशी संलग्न असले तरी त्यावर केंद्र आणि राज्यांनी अव्वाच्या सव्वा कर लादले आहेत. एखाद्याला आलेला झटका हे देशाचे धोरण होऊ शकत नाही. नोटाबंदीसारख्या चुकीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आणि मग ती सावरायला इंधनावर भरमसाठ कर लादून आर्थिक डोलारा सावरायचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांची किमंत सामान्य माणसाने का मोजावी, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच दिल्लीश्वरांनी काय काय चुका करून ठेवल्यात ह्याचा हिशोब त्यांच्या कानठळी नीट पोहोचेल इतका कडकडीत बंद झाला पाहिजे असे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

बंद मधून यांना वगळले 

या बंदमधून दूध पुरवठा, सर्व रुग्णालये, औषधांची दुकाने आणि शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये स्वत:हून बंदमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असे देखील निरुपम यांनी सांगितले. तसेच या बंदमध्ये मुंबईतील दुकानदार, व्यापारी, पेट्रोल पंपचालक, रिक्षा, टॅक्सी चालक संघटना, यांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांच्या संघटनांशी चर्चा सुरू आहे, असे निरुपम यांनी सांगितले. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बंदला सुरुवात होईल. बंद पूर्णपणे शांतते पार पडेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -