घरताज्या घडामोडीभगवती रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता; रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात हलविले

भगवती रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता; रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात हलविले

Subscribe

मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णालयात बेडची कमतरता भासत असतानाच आता गंभीर रुग्णांसाठी आवश्यक ठरणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. बोरिवली येथील भगवती रुग्णालयात बुधवारपासून ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे या रुग्णालयातील गंभीर अवस्थेतील, आयसीयूमधील २५ रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. या गंभीर घटनेचे राजकीय पडसाद उमटल्याने आता या रुग्णालयासाठी तातडीने ऑक्सिजनच्या साठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र बुधवारपासूनच ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. गुरुवारी सकाळपासूनच ऑक्सिजनची तीव्र टंचाई निर्माण झाली. परिणामी या रुग्णालयातील ऑक्सिजनवर असलेल्या २५ रुग्णांना तातडीने नजीकच्या कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात, जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आणि काही रुग्णांना जंबो कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले, अशी माहिती भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी,’ दै. आपलं महानगर’ शी बोलताना दिली.

- Advertisement -

तसेच, मुंबई महापालिका व राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळेच भगवती रुग्णालयात ऑक्सिजनची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी केला आहे. ऑक्सिजनची टंचाई होईपर्यंत शासन, पालिका प्रशासन यांच्या ही गंभीर बाब लक्षात का आली नाही, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, याप्रकरणी आपण स्वतः अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी चर्चा करून तातडीने ऑक्सिजनच्या सिलिंडरची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ज्या तज्ज्ञांची आवश्यकता भासते त्यांची कमतरता असल्याने ती कामेही इंजिनिअर ऐवजी डॉक्टरांनाच करावी लागत असल्याची खंतही आमदार चौधरी यांनी यावेळी केली.

- Advertisement -

दरम्यान, पालिका प्रशासनाने, ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा यासाठी तीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. भगवती रुग्णालयात २५ रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. आज अचानक ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. तातडीने पालिकेने १० रुग्णांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात तर इतर १५ रुग्णांना दहिसर येथील कोविड रुग्णालयात हलवण्यात आले. ऑक्सिजनची कमी असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून रुग्णांना शताब्दी रुग्णालय आणि दहिसर कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -