घरक्रीडाTest Rankings : टीम इंडिया सलग पाचव्या वर्षी नंबर वन! इंग्लंडने टाकले ऑस्ट्रेलियाला...

Test Rankings : टीम इंडिया सलग पाचव्या वर्षी नंबर वन! इंग्लंडने टाकले ऑस्ट्रेलियाला मागे

Subscribe

भारताचे सरासरी १२१ गुण झाल्याने त्यांनी अव्वल स्थान आपल्याकडे ठेवले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कसोटी क्रमवारीतील संघांच्या यादीत भारताने सलग पाचव्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार, इंग्लंडला एका स्थानाची बढती मिळाली असून त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. तसेच विराट कोहलीच्या भारतीय संघाला अव्वल स्थान राखण्यात यश आले आहे. भारताने २४ सामन्यांत २९१४ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताचे सरासरी १२१ गुण झाल्याने त्यांनी अव्वल स्थान आपल्याकडे ठेवले. न्यूझीलंडलाही क्रमवारीत दुसरे स्थान राखण्यात यश आले असून अव्वल दोन संघांमध्ये केवळ एका गुणाचा फरक आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातच पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाईल.

न्यूझीलंडला दुसरे स्थान राखण्यात यश

मागील वर्षभरात भारताने ऑस्ट्रेलियात २-१ अशी कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडला मायदेशात ३-१ असे पराभूत केले. या दोन कसोटी मालिका विजयांचा भारतीय संघाला फायदा झाला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांना प्रत्येकी २-० असे पराभूत केले. त्यामुळे त्यांना दुसरे स्थान राखण्यात यश आले.

- Advertisement -

२०१७-१८ या कालावधीतील निकाल वगळले

आयसीसीच्या पत्रकानुसार, या क्रमवारीत २०१७-१८ या कालावधीतील निकाल वगळण्यात आले आहेत. या क्रमवारीत मे २०२० नंतरच्या सर्व कसोटी सामन्यांचे निकाल १०० टक्के, तर त्याआधीच्या दोन वर्षांचे निकाल ५० टक्क्यांनी ग्राह्य धरले गेले आहेत. या निकषाचा इंग्लंडला (१०९ गुण) फायदा झाला असून त्यांनी ऑस्ट्रेलियाला (१०८ गुण) मागे टाकत तिसऱ्या स्थान पटकावले आहे.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -