घररायगडश्रीवर्धनच्या विकासासाठी कटिबद्ध,उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

श्रीवर्धनच्या विकासासाठी कटिबद्ध,उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

Subscribe

शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडणार नसून त्याकरिता आपण कटिबद्ध असल्याची निःसंदिग्ध ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

सुमारे 23 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणार्‍या शहराच्या शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्पाचे, तसेच समुद्र किनार्‍याच्या 6 कोटींच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन शुक्रवारी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने र. ना. राऊत हायस्कूलच्या प्रांगणात आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार सुरेश लाड, नगराध्यक्ष फैसल हुर्जुक, उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर, नगरसेवक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, शहराध्यक्ष जितेंद्र सातनाक, मुख्याधिकारी किरण मोरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

विकास कामांच्या निधीची मागणी केल्यानंतर आपण त्याची पूर्तता करू, मात्र हा पैसा जनतेचा असल्याने कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून तशा तक्रारी आल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू, असा इशारा पवार यांनी दिला. त्याचप्रमाणे होणार्‍या कामांवर आदिती तटकरे यांनीही जातीने लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. तर खासदार तटकरे यांनी गेल्या दोन चक्रीवादळांमुळे झालेले नागरिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पालकमंत्री तटकरे यांनी शहरासह तालुक्यातील विकास कामांची माहिती दिली.

यानंतर प्रशासकीय भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री तटकरे, खासदार तटकरे, आमदार तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांत अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी मोरे, विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. नंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरवेळी येणार्‍या वादळ किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी आरसीसीची पक्की घरे, शाळा, कार्यालये बांधण्याची सूचना केल्याचे ते म्हणाले. वीज पुरवठा खंडित होत असल्याने भूमिगत वाहिनी टाकण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्थानिक पत्रकारांनी शासकीय रुग्णालयात आयसीयू बेडची गरज लक्षात आणून देताच पवार यांनी 10 बेडची आयसीयू सुविधा देण्याचे मान्य केले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -