घरमुंबईवाझेला बनायचे होते सुपरकॉप्स, म्हणून अँटिलीया जवळ पेरली होती स्फोटके

वाझेला बनायचे होते सुपरकॉप्स, म्हणून अँटिलीया जवळ पेरली होती स्फोटके

Subscribe

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेण यांच्या हत्येचे कारण तपासाच्या दरम्यान स्पष्ट झाले होते. परंतु देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यामागे कारण समोर आलेले नव्हते. अनेकांनी आपआपल्या परीने वेगवेगळे तर्कवितर्क लढवत होते. परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. अखेर मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हाऊस परिसरात स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यामागचे कारण ‘एनआयए’ या तपास यंत्रणेने या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात कारण स्पष्ट केले आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलातील ‘सुपरकॉप्स’ बनायचे होते यासाठी त्याने हा कट रचला होता असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

मात्र, सुपरकॉप्स बनण्याच्या नादात सचिन वाझेने स्वतःचा बचाव करण्यासाठी मित्र मनसुख हिरेण याचा बळी दिला. एक डाव लपवण्यासाठी सचिन वाझेने मनसुख हिरेण याच्या हत्येचा कट रचला आणि या कटात तो आणि त्याचे सहकारी पोलीस अधिकारीसह दहा जण अडकले गेले. मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया हाऊस या आलिशान घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ ही कार मिळून आली होती. या कारमध्ये पोलिसांना जिलेटीन कांड्या आणि मुकेश अंबानींच्या नावे धमकीचे पत्र मिळून आले होते. दरम्यान ५ मार्च रोजी स्कॉर्पिओ कारचा मालक आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेण यांचा मृतदेह मुंब्रा खाडी येथे मिळून आला होता.

- Advertisement -

या दोन्ही गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे सोपण्यात आला होता. एनआयएने या दोन्ही प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययु युनिटचे तत्कालीन प्रभारी सपोनि. सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी लखनभैया हत्या प्रकरणातून पॅरोलवर बाहेर पडलेला पोलीस शिपाई विनायक शिंदे, गुन्हे शाखा कक्ष ११ चे तात्कालिन प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा या पाच आजी-माजी पोलिसासह क्रिकेट बुकी नरेश गोर, संतोष शेलार, मनीष सोनी, सतीश मोटकर, आनंद जाधव असे एकूण दहा जणांना अटक करण्यात आली होती. अटक आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरुंगात आहे.

विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत सीत्रे यांच्यासमोर आरोपपत्र सादर करण्यात आले. सादर करताना, तपास अधिकारी आणि एनआयएचे अधीक्षक विक्रम खलाटे देखील उपस्थित होते. विशेष सरकारी वकिलांनी २० प्रमुख साक्षीदारांच्या संरक्षणाची मागणी केली आणि न्यायालयाने ती मंजूर केली. एजन्सीने मुख्य साक्षीदारांचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर केला. या प्रकरणातील साक्षीदारांना धमकावण्यात आल्याचा दावा एनआयएने यापूर्वी केला होता. तपास यंत्रणेने न्यायालयाला असेही सांगितले की या प्रकरणी त्यांचा तपास सुरू आहे, एनआयएने म्हटले आहे की त्याच्याकडे वाझे, माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, सर्व्हिस पीआय सुनील माने, एपीआय रियाझुद्दीन काझी यांच्यासह सर्व १० आरोपींविरोधात आक्षेपार्ह सामग्री आहे. आरोपपत्रात तीनशेहून अधिक साक्षीदार, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे आहेत.

- Advertisement -

मुकेश अंबानींच्या दक्षिण मुंबईतील निवास स्थान, अँटिलियाजवळ उभी केलेली स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ स्वतः पार्क करून त्यानंतर तपास स्वतःकडे घेऊन हा गुन्हा उघडकीस आणून सचिन वाझे याला प्रसिद्धी मिळवायची होती व पूर्वीप्रमाणे त्याला सुपरकॉप्स बनायचे होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, उद्योगपतींकडे दहशत निर्माण करून पैसे उकळणे हा मुख्य हेतू होता. मात्र, हे प्रकरण अंगलट येत असल्याचे कळताच सचिन वाझे आणि इतरांनी स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन याची हत्या केली.

कथित दहशतवादी संघटना जैश -उल-हिंदशी संबंधित प्रमुख संशयिताचाही उल्लेख केला आहे, या संघटनेच्या अतिरेक्यांनी प्रथम स्कॉर्पिओ ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. एनआयए सूत्रांनी सांगितले की, जैश-उल-हिंद हे नाव कुणाला सुचले याचा शोध घेण्यात येत आहे. यासंबंधित एनआयएला मुख्य संशयिताशी एक महत्त्वाचा दुवा सापडला आहे. तो दुवा पोलीस अधिकारी असल्याचे समजते.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध पुढील कलम लावण्यात आले आहे.
कट रचणे (भादंवि १२०ब ) , पुरावे नष्ट करणे ( भादंवि २०१), स्फोटके ठेवणे जीवितास धोका निर्माण करणे ( भादंवि. २८६) हत्या (भादंवि. ३०२) हत्या करण्यासाठी अपहरण करणे (भादंवि.३६४) खंडणीसाठी धमकी देणे (भादंवि ३८४) मालमत्तेचा गैरव्यवहार (भादंवि. ४०३), फसवणूक ( भादंवि ४१९) , खोटे दस्तवेज तयार करणे (भादंवि ४६५) बोगस दस्तवेज खरे असल्याचे भासवण्याने (भादंवि ४७१) बनवत शिक्के तयार करणे (भादंवि ४७३) आणि भादंवि ५०६ गुन्हेगारी कृत्य करणे तसेच भादंवि ३ आणि २५ शस्त्र बाळगणे स्फोटक पदार्थ कायदा कलम ४ आणि युए (पी) अधिनियम कलम १६,१८ आणि २०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -