घरमहाराष्ट्रगोरेगाव पहाडी येथे म्हाडाची ३,०१५ घरे

गोरेगाव पहाडी येथे म्हाडाची ३,०१५ घरे

Subscribe

जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबईत हक्काचे घर असणे अनेकांचे स्वप्न असते. पण वाढणार्‍या घरांच्या किमती पाहता अनेकांना हे शक्य नसते. दरम्यान अशा सर्वांसाठी म्हाडा लॉटरी पद्धतीने बाजारभावापेक्षा कमी किमतीत घरे उपलब्ध करून देत असते. ज्यामध्ये प्रत्येकजण अर्ज करू शकतो आणि ज्यांचे नाव लॉटरीत निघेल त्याला कमी किमतीत हक्काचे अधिकृत घर मुंबईत घेता येते. दरम्यान, ठराविक काळानंतर विविध ठिकाणी ही घरे उपलब्ध होत असून आता म्हाडा नवीन 3 हजार 15 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल. मुंबईतील महत्वाचे ठिकाण असणार्‍या गोरेगाव येथील पहाडी याठिकाणी संबंधित घरे असून त्यांचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

एकूण 3 हजार 15 घरांपैकी दुर्बल घटकांसाठी 1 हजार 947 घरे राखीव आहेत. तर उर्वरित घरांमधील अल्प उत्पन्न गटासाठी 736, मध्यम उत्पन्न गटासाठी 227 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 105 घरे उपलब्ध आहेत. 25 लाख किमतीच्या आतमध्ये वन रुम किचन इतक्या आकाराचे घर या प्रकल्पात घेता येणार आहे.

- Advertisement -

यासारखेच आणखी प्रकल्प एमएमआर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करण्याचा म्हाडाचा विचार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले. तसेच पुण्यालाही 100 एकर जागा घेतली असून ठाण्यातही घरे बांधली जात आहेत. तसेच सातारा, सोलापूर, सांगली, मिरज जिथे जिथे म्हाडाच्या जागा आहे तिथे इमारती बांधून लोकांच्या घराचा प्रश्न सोडवला जाईल आणि म्हाडाच्या घरांचा दर खासगी बिल्डरांपेक्षा 60 टक्के कमी असेल, असेही आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी आणखी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यावेळी मुंबईत एक हजार मुला-मुलींसाठी वसतीगृह बांधणार असून याठिकाणी ग्रंथालय, जिम, खेळण्यासाठी कोर्ट असेल अशी सुविधा असणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पत्रा चाळ प्रकल्पही मार्गी लागत असून 26 जानेवारीला मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाईल, असे आव्हाड यांनी सांगितले. तसेच म्हाडाच्या 56 वसाहतींचा विकास करणार असून टागोर नगर, अभ्युदय नगर अशा अनेक ठिकाणी मोठ्या वसाहती असून त्यांचा विकास करणार असल्याचे आव्हाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -