घरआली दिवाळी २०१८मुंबईच्या हवेची पातळी दिवाळीमध्ये वाईट

मुंबईच्या हवेची पातळी दिवाळीमध्ये वाईट

Subscribe

१८० वरुन थेट २२१ एक्यूआयवर

मुंबईसह राज्यात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या संध्याकाळी ८ ते १० वेळेतच फटाके वाजवण्याच्या निर्बंधामुळे दिवाळीच्या पहिल्या दोन दिवशी किमान फटाक्यांचा सुरू राहणारा आवाज कमी झाला आहे. पण, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता मात्र खालावली असल्याचं समोर आले आहे.

’सफर’ या हवेच्या गुणवत्ता नोंदवण्यार्‍या प्रणालीने मंगळवारी दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी मुंबईचा गुणवत्ता निर्देशांक ३०६ असू शकतो असे नमूद करण्यात आले होते. पण, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक २२१ एक्यूआयवर पोहोचला. जो वाईट असल्याचे नोंदवण्यात आले आहे. मंगळवारी १८० एक्यूआय इतका हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक नोंदवण्यात आला होता आणि सोमवारी ८७ नोंदवण्यात आला होता. तर, गुरुवारी हाच गुणवत्ता निर्देशांक ३३५ वर पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

२ वर्षांपूर्वी मुंबईत ’सफर’ या प्रणालीने पुणे आयआयएटीएमद्वारे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मोजण्यासाठी यंत्रणा बसवली. त्यानुसार, एक्यूआय या प्रमाणात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मोजला जातो. त्यानुसार, मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बुधवारी २२१ एक्यूआयवर पोहोचला होता.

या शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक –

बुधवारी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंधेरीच्या हवेचा दर्जा अतिशय वाईट नोंदवला गेला असून ३५५ एवढा निर्देशांक मोजण्यात आला. त्याखालोखाल बोरिवलीच्या हवेचा ३०२ निर्देशांक आणि बीकेसी परिसरात ३०१ एवढा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मोजण्यात आला. माझगावमध्ये २६४ निर्देशांक नोंदवण्यात आला. तर, मालाडमध्ये २०७ एक्युआय निर्देशांक नोंदवण्यात आला.

- Advertisement -

असा असतो हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक –

सफर या प्रणालीतून ० ते ५०० एक्यूआय( एअर क्वॉलिटी इंडेक्स) द्वारे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मोजला जातो. त्यानुसार, ५० पर्यंत नोंदवण्यात आलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा उत्तम मानला जातो. ५१ – १०० हा समाधानकारक निर्देशांक असतो. १०१ ते २०० हा सामान्य निर्देशांक असतो. २०१ ते ३०० च्या दरम्यान असलेला एक्यूआय हा निर्देशांक वाईट मानला जातो. तर, ३०१ ते ४०० दरम्यान ही हवा अतिशय वाईट असते आणि ४०१ ते ५०० या एक्यूआय दरम्यान मोजली जाणारी हवा ही तीव्र प्रदूषित झालेली असते. त्यामुळे वाईट या निर्देशांकामध्ये मोजल्या जाणार्‍या हवेत हृदय आणि फुप्फुसाचा आजार असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. वृद्ध, प्रौढ आणि लहान मुलांनी जास्त शारीरिक कष्ट करु नये आणि घरातून बाहेर पडणे टाळावे असा सल्ला दिला जातो. या हवेमध्ये श्वसनाच्या विकारांना चालना मिळू शकते. त्यामुळे, त्या दृष्टीनेही काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टर करतात.

याविषयी सफरचे प्रकल्प संचालक यांनी सांगितलं की, ” मुंबईकरांनी दोन दिवस समाधानकारक हवा अनुभवली, मंगळवारी वातावरणातही बदल झाला असून फटाक्यांमुळे या हवेचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे यापुढचे आणखी काही दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे. बुधवारी अंधेरी परिसरात अतिशय वाईट दर्जा नोंदवण्यात आला आहे. “

” दिवाळी सुरू झाली आहे तर फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. त्यातून फक्त हवेचे प्रदूषणच नाही तर ध्वनी प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात होते. हवेच्या प्रदूषणामुळे वातावरणात प्रदूषकांचे प्रमाण वाढते आणि वारा नसल्यामुळे ही प्रदूषके हवेतच साचून राहतात. त्यातून श्वसनाचा त्रास, दम लागू शकतो. त्यामुळे हृदय आणि फुप्फुसाचा आजार असलेल्या रुग्णांनी अति शारीरिक श्रम टाळणे गरजेचे आहे. हवेत फोडले जाणारे फटाके हे संपूर्ण शरीराला व्याधी पोहचवू शकतात. उडणारे फटाके लावले तर त्वचा भाजण्याची शक्यता असते. दृष्टी जाण्याची भीती असते. फटाके फोडल्यामुळे पर्यावरण आणि ग्लोबल वॉर्मिंगवरही परिणाम होतो. तापमानाचा पारा वाढण्यासाठीदेखील फटाके मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. “
– डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक , सेंट जॉर्ज रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -