घरमहाराष्ट्रराऊतांच्या मालमत्तेवर टाच!

राऊतांच्या मालमत्तेवर टाच!

Subscribe

दादरमधील राहत्या घरासह 8 भूखंड जप्त, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई

मागील काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अखेर ईडीने मंगळवारी प्रत्यक्ष कारवाई केली. ईडीने संजय राऊत यांची दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांवर टाच आणली आहे. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ भूखंड घोटाळ्यात राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने आधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

या घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. तर दुसरीकडे यशवंत जाधव आणि राहुल कनाल या शिवसेना नेत्यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने केंद्रीय तपास यंत्रणांचे पुढचे लक्ष्य मातोश्री असणार का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -

या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त करत भाजपवर हल्ला चढवला. अशा कारवायांनी मी घाबरेन, असा भाजपचा गैरसमज आहे. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे. माझ्या अंगात सेनेचे रक्त आहे. सरकार पाडण्यासाठी आधी माझ्यावर दबाव होता. आता प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. माझ्या हत्येचा, हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांशीही माझे बोलणे झाले. माझ्यावर झालेले आरोप जर सिद्ध झाले तर मी समाजकारण, राजकारण सोडून देईल, असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळले.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात १ हजार ३४ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या खटल्यात ईडीने गेल्याच आठवड्यात आरोपपत्र दाखल केले आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून संजय राऊत यांनी पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावाने अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या भूखंडांची किंमत अंदाजे ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी केल्याचाही ईडीचा आरोप आहे. अलिबागमधील हे 8 भूखंड आणि दादरमध्ये वर्षा राऊत यांच्या नावावर असलेल्या राहत्या सदनिकेवर ईडीने टाच आणली आहे.

- Advertisement -

राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजीत पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती. शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली होती.

…तर सर्व मालमत्ता भाजपला दान करेन
राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात. भाजपचे दोन-चार नाचे आज कारवाईनंतर नाचत आहेत. २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि माझं मुंबईतील राहतं घर जप्त केलं. ज्यामध्ये माझं कुटुंब राहत होतं. ईडीने जप्त केलेली जमीन एक एकरही नसेल. आमच्या नातेवाईकांनी अधिकृत पैशांतून या जमिनी खरेदी केल्या होत्या. यामध्येही ईडीला आता आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला आहे. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. एक रुपया जरी गैरव्यवहारातला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत.
-संजय राऊत, खासदार, शिवसेना

देशात लोकशाही आहे का?
मतदान करा म्हणून जर मतदारांना धमक्या दिल्या जात असतील तर देशात लोकशाही आहे का? भाजपची दबावशाही सुरू आहे. भाजप धमक्या देऊन महाराष्ट्रात ईडीच्या कारवाया करीत आहे. हे देशासाठी धोक्याचे आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.
– आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री

संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते. मात्र संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्याचा सरकारवर परीणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकार आणि सरकारमधील संबंधित लोकांना बदनाम करण्यासाठी या यंत्रणा वापरल्या जात आहेत.
-जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईने भाजपला आनंद व्हायचे कारण नाही. राऊत यांना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या नेत्यांवर टीका करताना आनंदाच्या उकळ्या कशा फुटायच्या त्याची त्यांनी आठवण करावी. भाजपला काही उड्या मारायचे कारण नाही. कारण हा विषय भाजपचा नाही, तर एका तपास यंत्रणेचा आहे.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने रडीचा डाव खेळत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला आहे. खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई ही त्याच दबावतंत्राचा भाग आहे. परंतु अशा कारवायांना महाविकास आघाडी घाबरणार नाही. या दबाव तंत्राविरोधात एकत्रितपणे सामना करू.
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -