घरसंपादकीयअग्रलेखमेळावे नव्हे, भाजपची कोंबडझुंज!

मेळावे नव्हे, भाजपची कोंबडझुंज!

Subscribe

आज सार्‍या महाराष्ट्राचेच नव्हे तर कदाचित देशाचेही लक्ष मुंबईकडे असेल. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांचा दसरा मेळावा मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर होत आहे. गेल्या जूनमध्ये झपाट्याने राजकीय घडामोडी घडून शिंदे यांच्यासह ३३ आमदारांचा गट शिवसेनेतून बाहेर पडला. शिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षांचे मिळून आणखी ७ आमदारांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला. या सर्व वेगवान राजकीय घडामोडीमागे भाजपने ताकद उभी केल्याचे सुरुवातीपासून असलेले उघड गुपित नंतर पूर्ण उघडे झाले. भाजपच्या सहाय्याशिवाय या बंडखोरांना गुवाहाटीपर्यंत मजल मारता आली नसती. तेथील बडदास्तीचा व्हिडीओही समोर आला, नव्हे त्यावर बंडखोर आमदार शहाजी बापू यांनी आपल्या रांगड्या भाषेत, आम्ही एकदम ओक्के, असे बोलून शिक्कामोर्तब करून टाकले. सुरुवातीला राजकीय करमणूक म्हणून याकडे पाहिले गेले, प्रत्यक्षात त्यात भविष्यातील राजकारणाची बिजे पेरण्याची धूर्त खेळी भाजपच्या धुरिणींनी केली होती.

पुढे जून अखेरीस शिंदे गट आणि भाजप अपेक्षेप्रमाणे एकत्र येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून मोकळे झाले. इथेही भाजपने सावध भूमिका घेत मुख्यमंत्रीपदासाठी सज्ज देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर बसवून एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढविला. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिंदे आणि त्यांचे शिलेदार शिवसेनेतून बाहेर पडले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा विश्वासघात केला, अशी भूमिका शिंदे यांनी रेटून लावली. प्रत्यक्षात अडीच वर्षे शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणारे उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील काही मंत्री सत्तेचे लोणी खात होते. त्यामुळे शिंदे यांना अचानक आठवलेला हिंदुत्वाचा मुद्दा तकलादू असल्याची टीका विरोधकांनी सुरू केली. शिंदे यांना मिळालेला आमदार आणि खासदारांचा पाठिंबा लक्षात घेऊन या गटाकडून शिवसेनेवर हक्क सांगण्यात आला आणि हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात, नंतर तेथून निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन पोहचले आहे. याचा निकाल लगेचच येईल असे संभवत नाही.

- Advertisement -

शिवसेनेवर दावेदारी सांगण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार घमासान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज होत असलेल्या दसरा मेळाव्याकडे पाहिले जात आहे. सुरुवातीला शिवसेनेप्रमाणे शिंदे गट शिवाजी पार्कसाठी आग्रही होता. महापालिकेकडे शिवसेनेकडून सर्वप्रथम अर्ज करण्यात आला, तर शिंदे गटाने त्यानंतर अर्ज दाखल केला. पालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासन शिवसेनेला सहजासहजी मैदान वापरण्यास परवानगी देईल हे अजिबात संभवत नव्हते आणि झालेही तसेच! पोलिसांच्या सांगण्यावरून पालिका प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत दोन्ही गटांना परवानगी नाकारली. या दरम्यान शिंदे गटाने बीकेसीसाठी केलेला अर्ज सहजपणे संमत झाला. मात्र शिवाजी पार्कसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने पालिकेच्या निर्णयानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान वापरण्यास परवानगी दिली, इतकेच नव्हे तर पालिकेच्या भूमिकेवर ताशेरेही ओढले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आनंद गगनात मावेनासा होणे स्वाभाविक आहे.

अन्यथा स्थापनेपासून ५६ वर्षे शिवसेनाचा मेळावा याच मैदानावर होत आला आहे. बदलत्या राजकारणानंतर आणि शिवसेनेची ताकद वाढल्यानंतर बाळासाहेब ठाकरे काय बोलणार, याकडे प्रत्येक मेळाव्याच्यावेळी देशाचे लक्ष लागून राहात असे. इतकेच नव्हे तर भाजपशी सूत जुळल्यानंतर त्या पक्षाचे दिग्गज नेते शिवसेनेच्या व्यासपीठावर आले होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अन्य नेत्यांनी शिवसेनेच्या काही दसरा मेळाव्यांना हजेरी लावली आहे. पुढे ही प्रथा खंडित झाली. यावेळी शिंदे गटाच्या मेळाव्याला भाजपच्या नेत्यांना बोलवावे, असा काहींचा आग्रह आहे. परंतु काहींनी त्याला विरोध करून शिंदे गटाची ताकद दाखविण्याची हिच वेळ असल्याने भाजपच्या नेत्यांना निमंत्रण नको, अन्यथा या मेळाव्याचा मूळ हेतूच कोलमडून पडेल, असा युक्तिवाद केला आहे. तूर्त तरी भाजपकडून कोणी मेळाव्याला उपस्थित राहील अशी शक्यता वाटत नाही. तसे झाले तर शिंदे यांना राज्याच्या राजकारणात ताकदवान नेता म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्याचा हेतू सफल होणार का, हा औत्सुक्याचा भाग राहणार आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून खोेके, गद्दार अशी भाषा वापरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे गटाच्या एका खासदाराने तर मातोश्रीला १०० कोटी पोहचते व्हायचे असा आरोप करून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला आहे. किती कोटी, किती खोके हे आरोपांसाठी ठीक आहे. प्रत्यक्षात यातील सत्य कधीच समजणार नाही. त्यामुळे महागाईला तोंड देत गुजराण करणारे सामान्यजन या आरोप-प्रत्यारोपांकडे निव्वळ करमणूक म्हणून पाहत आहेत. शिंदे यांचे बंड निष्ठावंत, कडवट शिवसैनिकाला अजिबात रुचलेले नाही. त्यामुळे दसरा मेळाव्याला हा शिवसैनिक स्वयंस्फूर्तीने शिवाजी पार्कवर येणार, हे सांगायला कुणा राजकीय तज्ज्ञाची गरज नाही. दोन्ही बाजूंनी गर्दी जमविण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत. एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन महामेळावे होत असल्याने पोलिसांवर प्रचंड ताण आलेला आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलिसांचे काम अधिक वाढले आहे.

खरं तर एकाच दिवशी मेळावा घेण्याऐवजी अन्य दिवशी घेऊन शिंदे यांनी राजकीय परिपक्वता दाखवायला पाहिजे होती, असा एक सूर आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर, कल्याण, ठाणे, पनवेल या ठिकाणी अगोदरच वाहतूक कोंडीचा कहर झालेला असताना सभांना येणार्‍या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांमुळे ही समस्या अधिकच बिकट होणार आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असल्याने तेच-तेच ऐकावे लागणार की नव्या विचारांचे सोने कार्यकर्ते लुटणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकाच वेळी मुंबईत येणार असल्याने एकूणच माहोल हाय होल्टेज ड्रामासारखा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन्ही बाजूंना सबुरीने घेण्याचा वडिलकीचा सल्ला दिला आहे. दोन गट सभा घेऊन आपली ताकद आजमावू पाहत असले तरी दोन्हीकडे विखारी भाषा निघणार नाही याची काळजी नेत्यांना घ्यावीच लागेल. विखाराचे ‘सोने’ लुटणे परवडणारे नाही. त्यामुळे जरा संयमानेच..! भाजपने लावून दिलेल्या या कोंबडझुंजीत कोण बाजी मारणार की, आपापसात मारून मरणार हे येणारा काळच सांगू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -