घरलाईफस्टाईलशरीराला पोषकमूल्य देणारे किचनमधील पदार्थ

शरीराला पोषकमूल्य देणारे किचनमधील पदार्थ

Subscribe

स्वयंपाक तयार करताना पदार्थाला येणार्‍या चवीमागे फोडणीचा महत्त्वाचा वाटा आहे. भाजी, आमटी, वरण किंवा तत्सम पदार्थ तयार करताना तेल चांगले तापल्यानंतर त्यात क्रमाने मोहरी, जिरे, हिंग, हळद घातले जातात. हे सर्व तेलात तडतडले की सर्व पदार्थाचा अर्क पदार्थात मिसळतो. मात्र हे पदार्थ केवळ अन्नाची चव वाढवणारे नसून आरोग्यवर्धकही आहे. प्रत्येक फोडणीत घातल्या जाणार्‍या या प्रत्येक पदार्थातून शरीराला पोषकमूल्य मिळतात.

मोहरी
मोहरीचे तीन प्रकार असतात. पिवळी, तांबडी आणि काळी. या तीनही प्रकारच्या मोहरी गुणांनी सारख्याच आहेत. मोहरी भूक वाढवणारी, कृमीनाशक, कफवात-नाशक, पोटदुखी घालविणारी आहे. उचकी लागली असता मोहरीचे चूर्ण मधातून दिल्यास उचकी थांबते. मोहरी पाचक आहे. पोटात कृमी झाल्यास मोहरीचे पाणी दिल्यास चांगला फायदा होतो. मोहरी ही अग्निदेयक, पाचक, उत्तेजक, घाम आणणारे गुणकारी औषध आहे.

- Advertisement -

जिरे
उपवासासाठी केली जाणारी साबुदाण्याची खिचडी, खमंग काकडी या पदार्थासाठी तूप-जिर्‍याची फोडणी आवश्यक असते. जिर्‍याच्या वापरामुळे तूप पचायला सोपे जाते. जिर्‍याने चांगली भूक लागते आणि पचनक्रिया सुधारते. जिरे पचायला हलके आहे. त्यामुळे तेलात उष्ण अशी मोहरी घातल्यानंतर थंड प्रवृत्तीचे जिरे घातले जातात. जिरे तेलात तडतडल्यानंतर तातडीने दुसरा पदार्थ घालणे. कारण जास्त वेळ तापलेल्या तेलात जिरे ठेवल्यास फोडणी करपण्याची शक्यता असते. परिणामी पदार्थाच्या चवीवरही परिणाम होतो.

मेथी
गोड फळभाज्यांना फोडणी देताना मेथीचे दाणे घातले जातात. लाल भोपळा, दुधी, गिलकी, दोडकी या भाज्यांना फोडणी देताना मेथीचा आवर्जून वापर केला जातो. भाज्यांचे पचन होण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो. तेल तापल्यावर त्यात मेथीचे दाणे घालावे आणि हे दाणे चांगले तडतडू द्यावे. यानंतर चिरलेल्या भाज्या घालाव्यात. यामुळे चव तर सुधारतेच आणि पचनही चांगले होते.

- Advertisement -

हळद
हळद ही वेदनाशामक आहे. भाजी, वरणाला रंग येण्यासाठी वापरली जाणारी हळद जीवनसत्त्वांनी युक्त आहे. काही घरांमध्ये फोडणीत तर काही ठिकाणी सर्वात शेवटी हळद घालण्याची पद्धत आहे. मात्र हळद तेलात घातल्यामुळे अन्नपदार्थाला चांगला रंग येतो. हळद ही उत्तम स्नेहपाचक, आम्लपाचक, पोटातील कृमी नष्ट करणारी, त्वचारोग, आतड्यातील कृमींचा नाश करणारी आहे.

हिंग
हिंग हा झाडाच्या डिंकाचा प्रकार आहे. हिंगामुळे भूक वाढते. मोहरी व जिरे घातल्यानंतर तेलात हिंग घातला जातो. प्रामुख्याने कडधान्य किंवा डाळींमध्ये जिरे आवर्जून घातले जातात. यातून पोट फुगणे किंवा दुखणे यांसारखा त्रास उद्भवत नाही. अनेक घरांमधील सदस्यांना अधोवायूचा (गॅस) त्रास होत असल्यास भाजी, वरणात हिंगाचा जास्त वापर करावा. हिंगाचा खडा तीव्र व उष्ण वासाचा असतो. त्यामुळे काही ठिकाणी हिंगात गव्हाचे पीठ घालून स्वयंपाकासाठी वापरले जाते. हिंग हा अग्निवर्धक आणि आतड्यांवर उत्तेजक कार्य करणारा, पित्तवर्धक, खोकला आणि कफ कमी करणारा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -