घरमुंबईश्रेयवादात अडकणार कोस्टल रोड

श्रेयवादात अडकणार कोस्टल रोड

Subscribe

सागरी किनारा प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई आता जोरात सुरू झाली असून भूमिपुजनाच्या सोहळ्यातून डावलल्या गेलेल्या भाजपने मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पाची जाहिरातबाजी करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईत ठिकठिकाणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी फलक लावून कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाल्याने सरकारचे धन्यवाद मानले आहेत. सेना भाजपमधील वाद आणि कोळी बांधवांचा विरोध यामुळे रविवारी होणार्‍या भूमिपुजन कार्यक्रमात याचा मोठा परिणाम दिसणाची शक्यता आहे.

मुंबई सागरी किनारा प्रकल्पाचे भूमिपुजन रविवारी 16 डिसेंबर रोजी भुलाभाई देसाई रोडवरील अमरसन्स उद्यान येथे कंबाला हिलजवळ सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपुजन होत आहे. मात्र, याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत येणार आहेत. ते येण्याआधीच भाजपाला डावलून भूमिपुजनाचा बार उडवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या सेनेची डोकेदुखी कोळी बांधवांच्या विरोधामुळे आता वाढली आहे. त्यातच कोळी बांधवांच्याबाजुने मनसे उभी राहिल्यामुळे सेनेच्या नेत्यांची भंबेरी उडाली आहे.

- Advertisement -

सागरी किनारा रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) कोळी बांधवांचा होणारा विरोध आणि त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतल्यानंतर शनिवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासमवेत शिवसेनेच्या नेत्यांनी कोळी बांधवांच्या नेत्यांची बैठक घडवून आणली. प्रकल्पामुळे कोळी बांधवांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याची ग्वाही देत, आयुक्तांनी प्रकल्प कामाचे सादरीकरण सर्वच कोळीवाड्यांमध्ये केले जाईल, असे आश्वासन दिले.

कोळी बांधवांकडून होणारा विरोध लक्षात घेता सेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह कोळी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत आयुक्तांनी तांत्रिक अभ्यास करून समस्यांचे निवारण केले जाईल असे आश्वासन दिले. याकरता कोळीवाड्यांमध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचे सादरीकरण केले जाईल असेही आश्वासन दिल्याचे समजते.

- Advertisement -

कोस्टल रोडमुळे कोळीवाडे बाधित होऊन कोळी बांधवांचे नुकसान होणार असल्याने या समाजाकडून होणारा विरोध लक्षात घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या मुद्द्यावर रविवारी सकाळी दहा वाजता वरळी कोळीवाड्याला भेट देणार आहेत. या भेटीमध्ये राज ठाकरे कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेणार आहेत. मात्र, दुसरीकडे या प्रकल्पाच्या भूमिपुजनातून डावलल्या गेलेल्या भाजपाने मुंबईत होर्डींगबाजी करत कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. होय, कोस्टल रोड मुंबईचे स्वप्न अशा आशयाचे फलक लावून सर्व परवानग्या उपलब्ध करून दिल्यामुळे कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाल्याबद्दल या फलकांवर धन्यवाद मानले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -