घरमुंबईपाळीव प्राण्यांवरचे प्रेम मान्य पण...; उच्च न्यायालयाने सुनावले

पाळीव प्राण्यांवरचे प्रेम मान्य पण…; उच्च न्यायालयाने सुनावले

Subscribe

न्यायालयाने हा गुन्हा नोंदवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तरुणाला द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

मुंबईः प्राणी प्रेमी पाळीव प्राण्यांवर त्यांच्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. पण पाळीव प्राणी हे मनुष्य प्राणी नाहीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. वेगाने वाहन चालवून एका श्वानाचा जीव घेतल्याप्रकरणी चालकावर नोंदवलेला गुन्हा रद्द करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे निरीक्षण नोंदवले. भारतीय दंड संहितेत वेगाने वाहन चालवून एखादाला जखमी करणे अथवा मृत्यूसाठी कारणीभूत ठरणे यासाठी शिक्षेची तरतुद आहे. मात्र त्या कलमांचा वापर प्राण्यांच्या अपघातासाठी केला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी न्यायालयाने हा गुन्हा नोंदवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तरुणाला द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

पुढे न्यायालय म्हणाले, भारतीय दंड संहिता कलम २७९ हे वाहन चालवून एखाद्याच्या जिवीताला धोका करण्यासाठी वापरले जाते. एखाद्याच्या जीवाला धोका केल्यास कलम ३३७ अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो. पाळीव श्वान किंवा मांजर हे त्यांना पाळणाऱ्यांच्या कुटुंबाचे सदस्य असतात. पण ते मनुष्यप्राणी नाहीत. त्यामुळे या कलमांतर्गत एखाद्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही.

श्वानाला बाईकने उडवल्याची घटना मरीन ड्राईव्ह येथे एप्रिल २०२० मध्ये घडली होती. स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा मानस मंदार येथून जात होता. त्यावेळी तेथे एकजण भटक्या श्वानांना अन्न भरवत होता. त्यातील एक श्वान अचानक मानसच्या बाईकसमोर आला. बाईकची धडक लागून तो श्वान जखमी झाला व नंतर त्याचे निधन झाले. या घटनेत मानसही जखमी झाला.

- Advertisement -

पोलिसांत याची तक्रार करण्यात आली. त्याचा गुन्हाही नोंदवण्यात आला. न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. भटक्या श्वानाला मारण्याचा मानसचा हेतू होता. तो वेगाने बाईक चालवत होता, असे कुठेही सिद्ध होत नाही. अचानक मानसच्या बाईकसमोर श्वान आला. त्यामुळे त्याने ब्रेक मारला. त्यात श्वान जखमी झाला व नंतर त्याचे निधन झाले, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.

तुम्ही कायद्याचे रक्षक आहात; पोलिसांना न्यायालयाने फटकारले

पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत. त्यामुळे गुन्हा नोंदवताना, पुढे आरोपपत्र दाखल करताना थोडं सर्तक राहा, असे खडेबोलही न्यायालयाने पोलिसांना सुनावले.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -