घरमुंबईखातेतंर्गत पीएसआय परीक्षेचा निकाल दहा वर्षांनी होणार जाहीर; मॅटचे आदेश

खातेतंर्गत पीएसआय परीक्षेचा निकाल दहा वर्षांनी होणार जाहीर; मॅटचे आदेश

Subscribe

पोलीस नाईक, पोलीस हवालदार, हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे खातेअंतर्गत होणाऱ्या पोलीस उप निरीक्षक पदाच्या परीक्षेला पात्र असतील असा नियमच सन २०१३ साली करण्यात आला. त्याआधी हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेच या परीक्षेसाठी बसू शकत होते. मात्र २०१३ मध्ये नियमांत बदल झाल्याने २८ हजारजण या परीक्षेला बसले होते.

मुंबईः सन २०१३ मध्ये पोलीस उप निरीक्षक पदासाठी झालेल्या खातेतंर्गत लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) पोलीस खात्याला दिले आहेत. या परीक्षेला २०१३ मध्ये २८ हजारजण बसले होते. त्यातील १९ हजार जण ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांचा निकाल आता जाहीर होणार आहे.

पोलीस नाईक, पोलीस हवालदार, हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे खातेतंर्गत होणाऱ्या पोलीस उप निरीक्षक पदाच्या परीक्षेला पात्र असतील, असा नियमच सन २०१३ साली करण्यात आला. त्याआधी हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेच या परीक्षेसाठी बसू शकत होते. मात्र २०१३ मध्ये नियमांत बदल झाल्याने २८ हजारजण या परीक्षेला बसले होते. त्यातील १९ हजारजण उत्तीर्ण झाले. त्यातही या परीक्षेचा निकाल सन २०१३ पुरताच म्हणजे एका वर्षापुरताच असेल असेही सांगण्यात आले होते. तसे परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यामुळे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पोलीस उप निरीक्षक पदावर बढती मिळणार आहे.

- Advertisement -

या परीक्षेत कोणाला किती गुण मिळाले, कोणाची काय सेवा ज्येष्ठता आहे, याची काहीच माहिती न सांगता २०१७ मध्ये यातील काही जणांना पोलीस उप निरीक्षक पदी बढती देण्यात आली. त्यांनतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या काहीजणांनी संपूर्ण प्रक्रियेविरोधातच मॅटसमोर याचिका केली. मॅट सदस्य ए. पी. कुऱ्हेकर यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. २०१३ सालच्या परीक्षेचा निकाल एका वर्षापुरताच लागू असेल असे प्रशासनाचे परिपत्रक सांगते. त्यानंतर पुन्हा पोलीस उप निरीक्षक पदासाठी जागा निघाल्या तर नव्याने परीक्षा द्यावी लागेल असेही हे परिपत्रक सांगते. हा अन्याय आहे. आम्ही परीक्षा दिली आहे. उत्तीर्ण झालो आहोत. पुन्हा परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ते परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती. या अर्जाची दखल घेत मॅटने ते परिपत्रक रद्द केले. अर्जदारांसाठी adv अरविंद बांदीवडेकर व adv सी.टी चंद्रातरे यांनी बाजू मांडली तर पोलीस खात्याकडून एस. पी. मंचेकर यांनी युक्तिवाद केला.

 

- Advertisement -

कोणाला किती गुण मिळाले हे होणार जाहिर

सन २०१३ साली झालेल्या परीक्षेचा निकाल पोलीस प्रशासनाने जाहीर करावा. या परीक्षेत कोणाला किती गुण मिळाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सेवा ज्येष्ठता, अशा प्रकारे हा निकाल जाहिर करावा. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांपैकी कोणाला कशाच्या आधारे पोलीस उप निरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे याचा तपशीलही यात असावा, असेही मॅटने आदेशात नमूद केले आहे.

अंदाजे ४३ वर्षांचा कालावधी लागेल

सन २०१३ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांना पोलीस उप निरीक्षक पदी बढती देण्यासाठी किमान ४३ वर्षे लागतील असे प्रतिज्ञापत्र प्रशासनाने मॅटमध्ये सादर केले आहे. त्यामुळे २०१३ साली उत्तीर्ण झालेल्या किती जणांना बढती मिळणार हे बघावे लागेल.

अधिकृत संकेतस्थळावर निकाल होणार जाहिर

येत्या तीन महिन्यात पोलीस खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहिर करावा, असेही मॅटने आदेशात नमूद केले आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -