घरलाईफस्टाईलमॅक्युलर डिजनरेशन आजाराविषयी

मॅक्युलर डिजनरेशन आजाराविषयी

Subscribe

वृद्धापकाळ ही जीवनातली अशी अवस्था असते जेव्हा माणसाचे केवळ शरीरच थकते असे नाही तर वयोमानानुसार होणारे विकारही बळावतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये मुख्यत्वे दिसून येणारे विकार म्हणजे डिमेन्शिया,अल्झायमर, ओस्टीओआर्थयाटीस, पार्किंसन्स आणि वयोमानामुळे होणारे एएमडीसारखे डोळ्यांचे विकार. एकूण डोळ्यांच्या विकारांपैकी वयोमानानुसार होणार्‍या मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) या विकारामुळे जगात ८.७% अंधत्वाचे प्रमाण आहे. ज्येष्ठांमध्ये गंभीर स्वरुपात अंधत्व येण्याच्या कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण आहे. यामध्ये रेटीनाच्या मध्य भागापाशी एक छोटा ठिपका असलेल्या आणि स्पष्ट, केंद्रवर्ती नजर यासाठी डोळ्याला गरजेच्या असलेल्या मॅक्युलाचे नुकसान होते.

एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे काय?
एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन या अवस्थेत रेटिनामधील मॅक्युला या भागावर परिणाम होतो. मॅक्युला हा डोळ्याच्या मागील भागात असलेला रेटिनाचा सर्वांत संवेदनशील भाग आहे. या विकारात दृष्टीकेंद्रात काळे बिंदू तयार होऊन मॅक्युलाला हानी पोहोचते. रुग्णाला वाचन, ड्रायव्हिंग, स्वयंपाक आदी दैनंदिन कामे अवघड होऊन बसतात तर चेहरे ओळखण्यातही समस्या येतात. या विकारामुळे दृष्टी अस्पष्ट किंवा अंधुक होते, रंग संवेदनशीलतेवर परिणाम होतो, काळे डाग दिसतात, सरळ रेषा नागमोडी दिसतात.

- Advertisement -

एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन झाल्यास काय करावे
तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा-
तुमच्या नेत्रतज्ज्ञांकडून नियमितपणे डोळ्यांची तपासणी करावी. त्यामध्ये प्युपिल डायलेशनचा समावेश असावा. लवकर आणि वेळेवर निदान झाल्यास त्यावर होणार्‍या उपचारामुळे एएमडीचा फैलाव होण्यावर नियंत्रण मिळते.

चांगल्या गोष्टींसाठी बदल
रुग्ण व त्यांचे काळजीवाहक यांना या स्थितीची संपूर्ण कल्पना असणे गरजेचे असते. रुग्णांना सोयीचे जावे यासाठी (एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन )एएमडीबरोबर जगण्याच्या दृष्टीने त्यांनी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते.

- Advertisement -

चुकीच्या सवयी सोडा
धूम्रपान हे संपूर्ण शरीराप्रमाणे तुमच्या दृष्टीसाठीही हानीकारक असते. एएमडीचा धोका धूम्रपान करणार्‍यांना ते न करणार्‍यांपेक्षा दुपटीने जास्त असतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्यामुळे डोळ्यांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो.

पुरेसा योग्य प्रकाश आणि रंगसंगती निवडा
योग्य प्रकाशयोजना आणि व्यवस्थित रंगसंगती साधली तर रुग्णाचे आयुष्य बरेच सुकर होते. विरोधाभासी रंग वापरून रुग्ण हा प्रश्न सोडवू शकतात. उदाहरणार्थ: गडद रंगाच्या टेबल क्लॉथवर पांढर्‍या रंगाची ताटं मांडणे. वाचण्यात अडचण येत असेल तर भिंगाचा वापर करणे वा तुमच्या संगणक, सेलफोन किंवा इ-रिडरवर कॉन्ट्रास्ट पातळी वाढविणे असे उपाय करता येतात.

स्पर्शाची जाणीव बळकट करा
दृष्टी अधू होत असल्यामुळे स्पर्शाची जाणीव आणखी महत्त्वाची बनते. घरातल्या जवळपास प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून रुग्ण त्यांची स्पर्शाची ताकद वाढवू शकतात. विविध प्रकारच्या वस्तू लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळे आकार, रंग आणि पदार्थांच्या उंचवट्यांचा उपयोग करू शकतात. उदाहरणार्थ: विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील दिव्याच्या बटणासाठी जास्त उंच उंचवटा. विविध प्रकारची भांडी ओळखण्यासाठी रबर बँडचा वापर.

सकस पदार्थ खा
रंगीबेरंगी फळे आणि हिरव्या पालेभाज्या,अँटीऑक्सिडंट्स असलेले इंद्रधनुषी जेवण घ्या. रेटीनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी ते उपयुक्त असतात. पालक, लेट्युस, कोलार्ड प्रकारचा कोबी आणि सलगम यासारख्या गडद हिरव्या भाज्या आणि पालेभाज्या यामध्ये ल्युटेन आणि झेक्सांथिन ही डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त पोषक द्रव्ये असतात.

सकारात्मक रहा
एएमडीचे निदान झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यात रुग्ण नैराश्याचा सामना करतात. त्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे खूप गरजेचे असते.
-डॉ. अजय दुदानी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -