घरमहाराष्ट्रअमेरिकी पर्यटक 45 वर्षांनी पुन्हा वरंध मध्ये!

अमेरिकी पर्यटक 45 वर्षांनी पुन्हा वरंध मध्ये!

Subscribe

जुन्या आठवणींना नवा उजाळा

विदेशात दूरवर राहणारा एखादा माणूस भेट देऊन गेलेल्या ठिकाणी पुन्हा येईलच, असे नाही, मात्र 1972 साली एका संस्थेच्या माध्यमातून वरंध गावात आलेल्या अँडी नावाच्या परदेशी पर्यटकाने आपल्या भारत भ्रमणात तब्बल 45 वर्षांनी याच गावाला पुन्हा सपत्नीक भेट दिली. 1972 च्या स्मृतींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. ग्रामस्थांनीदेखील त्यांचे उत्साहात आणि आनंदात स्वागत केले. याच गावात तो दोन वर्षे राहिला होता, नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले होते. ग्रामस्थांचे त्याच्याशी जावाभावाचे नाते जडले होते. पण आता इतक्या वर्षांनंतर त्याच्यावेळी असलेल्यापैकी एकही व्यक्ती गावात नव्हती.

सध्या लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू आहे. मत द्या, म्हणून आलेला उमेदवार मतदानानंतर पुन्हा भेटण्यास येईल याची खात्री नाही. सामाजिक जीवनातदेखील माणूस इतका व्यस्त झाला आहे की, त्याला नातीगोती टिकवणे कठीण झाले आहे. नोकरीनिमित्त असलेला सरकारी कर्मचारी देखील एकदा का बदली होऊन गेला की तो पुन्हा येत नाही. मात्र 1972 मध्ये तालुक्यातील वरंध गावात आलेल्या एका अमेरिकन नागरिकाने मात्र या स्मृती जपल्या आहेत.

- Advertisement -

एका संस्थेच्या माध्यमातून अँडी हा अमेरिकन नागरिक वरंध गावात आला होता. या ठिकाणी त्याने दुबार शेतीचे प्रात्यक्षिक येथील ग्रामस्थांना दाखविले होते. एव्हढेच नव्हे तर त्याने नैसर्गिक शेती कशी करावी, याबाबत शेतकर्‍यांना केवळ मार्गदर्शनच केले नाही तर दोन वर्षे याच ठिकाणी राहून शेतीमधील विविध प्रयोगदेखील केले. त्यानंतर तो आपल्या मायदेशी गेला होता. सध्या तो बोटीने भारत भ्रमण करत आहे. 30 मार्च रोजी अँडी बोटीने मुंबईत आला. त्यानंतर त्याने वरंध गाव गाठले. ज्या ठिकाणी तो राहिला होता त्या खोलीला आणि ज्याठिकाणी शेती केली होती त्या जमिनीवर जाऊन पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयात त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपसरपंच योगिता धनावडे, शहाजी देशमुख, आशुराज देशमुख, सचिन देशमुख, संभाजी देशमुख, राजेंद्र जांभळे, प्रकाश कोलमकर, चंदू खोत, देशमुख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

1972 मध्ये शासनाच्या कृषी प्रशिक्षण भेट योजनेच्या माध्यामतून त्यावेळी अँडी आला असावा, अशी माहिती ग्रामस्थ देत आहेत. अँडी याने त्याला दिलेल्या जमिनीत फळबाग, नैसर्गिक शेती केली होती. या कालावधीत त्याने वरंध घाट, येथील ग्रामीण जीवनाबाबत सुंदर फोटोग्राफी केली होती. त्यावेळी असलेल्या एसटी बसचा फोटो त्याने यावेळी शेअर केला आहे.
वरंध हे तालुक्यातील आदर्श गाव आहे. कृषी क्षेत्रात या गावाने प्रगती केली आहे. भात पिकासह विविध कडधान्य, भूईमूग अशी शेती केली जाते. या बदलाचे समाधान अँडी याने यावेळी व्यक्त केले. त्यावेळचे गावात आता कोणी राहिले नाही, शिवाय नवतरुण देखील गावाबाहेर आहेत. असे असले तरी त्याचे स्वागत ग्रामस्थांनी आनंदाने केले. वरंध गावात तास दोन तास चर्चा करून अँडी पुढील प्रवासाला निघून गेला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -