घरक्रीडाअशी ही बनवाबनवी....

अशी ही बनवाबनवी….

Subscribe

अशी ही पळवापळवी...

आफ्रिका खंडातील जवळपास सर्वच देश गरीब असल्याची आपल्याला कल्पना आहे. मात्र, या गरीब देशांत प्रतिभावान अ‍ॅथलिट्सचा तोटा नाही. या अ‍ॅथलिट्स पुढे येण्यासाठी पैशाची गरज भासते. याचा फायदा आखाती आणि युरोपियन देश घेताना बर्‍याचदा पाहायला मिळते. त्यांच्याकडे डॉलर्स उधळायची काही कमतरता नाही. मात्र, या गोष्टीचा फटका भारतासारख्या देशांना बसतो. गेल्या वर्षीच झालेल्या एशियाडमध्ये द्यूती चंदला (१०० व २०० मीटर), हिमा दासला (४०० मीटर) यांच्यासारख्या भारतीय अ‍ॅथलिट्सना मूळच्या आशियाई नव्हे तर आफ्रिका खंडातील असलेल्या अ‍ॅथलिट्सचाच सामना करून सुवर्णपदकाला मुकावं लागलं होतं!

एका देशाचा अ‍ॅथलिट दुसर्‍या देशात स्थलांतरीत झाला आणि स्थलांतरीत झालेल्या नव्या देशाकडून धावू लागला, अशा गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत. कधीकधी तर या कहाण्यांनी अ‍ॅथलेटिक्स विश्वातील वातावरण थोडं हलकंफुलकं, मनोरंजकदेखील केलंय! वानगीदाखल अनेक उदाहरणं देता येतील!

- Advertisement -

केनियाचा विल्सन किपकेटर (८०० मीटर) शिकायला म्हणून डेन्मार्कला गेला आणि डेन्मार्कचं वातावरण अतिशय आवडल्याने तिथेच स्थायिक झाला. पुढे डेन्मार्कसाठी धावण्याचं स्वप्न पाहू लागला. डेन्मार्कमधील स्थलांतरितांसाठी असलेल्या कडक नियमांनी त्याची पुरती दमछाक केली, परंतु तरीही तो डेन्मार्ककडून धावला आणि कायमचा डेन्मार्कवासी होऊन गेला! ब्रिटिश अ‍ॅथलिट फियोना मे ही लांब उडीत सुवर्णपदक पटकावल्यावर, आनंद साजरा करण्यासाठी डिस्कोत नाचायला म्हणून गेली आणि तिथे इटालियन पोलव्हॉल्टर जियानी इपिचिनोच्या प्रेमात पडून इटलीवासी होऊन गेली. कायमची! आफ्रिका खंडातील सिएरा लीऑन या देशाची युनिस बार्बर ही अ‍ॅथलिट, देशातील दहशतवादी कारवायांना कंटाळून, मुक्त वातावरणातल्या फ्रान्समधे कायमची निघून गेली.

क्युबामध्ये राहणार्‍या न्यूर्का मोंटोल्वाची क्युबातील एका हॉटेलमधे एका स्पॅनिश उद्योजकाशी भेट झाली आणि भेटीचं प्रेमात रूपांतर होऊन न्यूर्का कायमची स्पेनला निघून गेली. अ‍ॅथलेटिक्सप्रेमींना अशा सुरस आणि चमत्कारिक कहाण्या कानावर यायची सवय आहे, परंतु अ‍ॅथलेटिक्समधील बनवाबनवीच्या आणि पळवापळवीच्या कहाण्या मात्र नव्याने ऐकायला येताहेत! वरील प्रकाराकडे लक्ष देण्याचं कारण म्हणजे त्या कहाण्या भारताशीदेखील संबंधित आहेत. कशा ते पहा.

- Advertisement -

३००० मीटर्स स्टीपलचेसमधील स्त्री-पुरुष या दोन्हीही गटातले विश्वविक्रम आशियाई अ‍ॅथलिट्सच्या नावावर आहेत हे तुम्हाला ठाऊक असेल. पुरुषांच्या गटातील विश्वविक्रम कतारच्या सैफ सईद शाहीनच्या तर महिलांच्या गटातील विश्वविक्रम बहारिनच्या रूथ जिबेटच्या नावावर आहे. मात्र, हे दोन अ‍ॅथलिट हे मूळ केनियाचे आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? आखातातील श्रीमंत देशांनी पेट्रोडॉलर्सच्या जीवावर त्यांना आपल्या देशाचं नागरिकत्व बहाल करून त्याबदल्यात त्यांच्याकडून पदकं, विश्वविक्रम मिळवून क्रीडाक्षेत्रातील आपली प्रतिष्ठा वाढवायचा प्रयत्न आता सुरू केला आहे. बरं हे काही अपवादात्मक उदाहरण नाही.

गेल्या वर्षीच्या एशियाडमध्ये द्यूती चंदला (१०० व २०० मीटर), हिमा दासला (४०० मीटर), सुधा सिंगला (३००० मीटर स्टीपलचेस), महंमद अनस (४०० मीटर), धरून अय्यासामी (४०० मीटर हर्डल्स), पुरुषांच्या रिले आणि मिश्र रिले संघाला या मूळच्या आशियाई नव्हे तर आफ्रिका खंडातील असलेल्या अ‍ॅथलिट्सचाच सामना करून सुवर्णपदकाला मुकावं लागलं होतं ! कुणी म्हणेल ही तर गेल्या वर्षाची कहाणी झाली, तर, अगदी कालसुद्धा जॉन कीबेत (केनिया – ३००० मीटर स्टीपलचेस), विन्फ्रेड यावी (५००० मीटर -केनिया), साल्वा नासेर (नायजेरिया – ४०० मीटर) या आफ्रिकी खंडातील अ‍ॅथलिट्समुळे, भारताला आणि इतर देशांना सुवर्णपदकापासून वंचित राहावं लागत आहे. कतार, बहारिन आणि संयुक्त अमिरातीसारखे आखातातील श्रीमंत देश, आफ्रिका खंडातील गरीब देशांकडून अ‍ॅथलिट पळवून तर आणतात, सुवर्णपदक, विश्वविक्रमी कामगिरी करणार्‍याची कदरदेखील करतात, पण जे अ‍ॅथलिट नंबरात येत नाहीत, त्यांची खैर नसते! एव्हाना इतर आफ्रिकी अ‍ॅथलिट्सच्या दर्दभर्‍या कहाण्यासुद्धा वेगळ्या अर्थाने गाजत आहेत.

कतारला अपेक्षित पदकं आणि विश्वविक्रम स्वतःतर्फे बहाल करणार्‍या स्टिफन चेरेनो उर्फ सैफ सईद शाहीनवर, केनियात टीकेचा भडीमार होतो आहे, परंतु आता त्याची अ‍ॅथलेटिक्समधील कारकीर्द संपल्याने स्टिफनला त्याचे काही सोयरसुतक उरलेले नाही. चिनी अ‍ॅथलेटिक्सविश्वसुद्धा आखाती देशांच्या पळवापळवीने बेजार आहे. गरीब आफ्रिकी खंडात दर्जेदार परंतु गरीब असलेल्या अ‍ॅथलिट्सचा तोटा नाही आणि आखाती राष्ट्रांकडे डॉलर्स उधळायची काही कमतरता नाही. त्यामुळे राजरोस सुरू असलेली ही बनवाबनवी, पळवापळवी अगदी खुले आम व्यवस्थित सुरू आहे. आजच्या घडीला जरी आशियाई अ‍ॅथलेटिक्स विश्वातले चित्र शांत दिसले तरी त्या शांत चित्राच्या पाठी अनेक देशातील अ‍ॅथलिट्सच्या मनातील खदखद आता व्यक्त होऊ लागली आहे.
पाहूया काय होतं ते!

– उदय ठाकूरदेसाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -