घरक्रीडालिव्हरपूलची जेतेपदाची सिक्सर

लिव्हरपूलची जेतेपदाची सिक्सर

Subscribe

 युएफा चॅम्पियन्स लीग

मोहम्मद सलाह आणि डिवॉक ओरीगीच्या गोलच्या जोरावर इंग्लिश संघ लिव्हरपूलने दुसरा इंग्लिश संघ टॉटनहॅम हॉट्सपरचा २-० असा पराभव करत व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा युएफा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकण्याची त्यांची सहावी वेळ होती. या विजयामुळे लिव्हरपूलने मागील वर्षीच्या अंतिम फेरीत रियाल माद्रिदने केलेला केलेल्या पराभवाचे आणि यंदा प्रीमियर लीगमध्ये दुसर्‍या स्थानी येण्याचे दुःख मागे टाकले आहे. लिव्हरपूलचे प्रशिक्षक जुर्गन क्लॉप हे चॅम्पियन्स लीग जिंकणारे पाचवे जर्मन प्रशिक्षक आहेत.

लिव्हरपूल आणि टॉटनहॅम हे संघ आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखले जात असल्याने हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. या सामन्याची लिव्हरपूलने आक्रमक सुरुवात केली. साडीयो मानेने केलेला क्रॉस टॉटनहॅमच्या मुसा सिसोकोच्या हाताला लागल्याने लिव्हरपूलला वादग्रस्तरित्या २५व्या सेकंदाला पेनल्टी मिळाली, ज्यावर मोहम्मद सलाहने चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीच्या इतिहासातील दुसरा सर्वात जलद गोल करत लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर टॉटनहॅम आपला खेळ सुधारेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. उलट लिव्हरपूलच्या ट्रेंट अ‍ॅलेक्सझॅन्दर-आर्नोल्ड आणि अँडी रॉबर्टसन यांनी चांगले फटके मारत गोल करण्याचा प्रयत्न केला. मध्यंतराला लिव्हरपूलने आपली १-० अशी आघाडी कायम राखली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर टॉटनहॅमने आपला खेळ काहीसा उंचावला. त्यांनी राखीव फळीतून लुकास मॉरा आणि फर्नांडो लॉरेंटे या आक्रमणातील खेळाडूंना मैदानात उतरवले. मात्र, लिव्हरपूलच्या बचावफळीसमोर त्यांची डाळ शिजली नाही. सॉन ह्युंग मिन आणि क्रिस्टियन एरिक्सन यांनी मारलेले फटके लिव्हरपूलचा गोलरक्षक अ‍ॅलिसनने चांगल्या पद्धतीने अडवल्यामुळे टॉटनहॅमचा गोल झालाच नाही. अखेर ८७व्या मिनिटाला बार्सिलोनाविरुद्ध उपांत्य फेरीत २ गोल मारणार्‍या डिवॉक ओरीगीने गोल करत लिव्हरपूलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत राखत त्यांनी हा सामना जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -