घरक्रीडाटॉन्टनची बारी आली!

टॉन्टनची बारी आली!

Subscribe

इंग्लंड हा एक ‘विकसित’ देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपला गैरसमज होतो की, या देशातील सर्व राज्य आणि शहरे भव्यदिव्यच असणार. मात्र, भारत आणि इतर देशांप्रमाणेच इंग्लंडमध्येही बरीच अशी शहरे आहेत, जी लंडनसारख्या शहरांच्या तुलनेत छोटी आहेत आणि यापैकीच एक आहे सॉमरसेट. इंग्लंडच्या दक्षिण पश्चिम भागात असलेल्या सॉमरसेटमध्ये द कूपर असोसिएट्स कौंटी ग्राऊंड, टॉन्टन हे एक छोटे स्टेडियम आहे. सॉमरसेट कौंटी क्रिकेट क्लबचे घर असणार्‍या या मैदानात केवळ ६ हजार ५०० इतकी आसनक्षमता असल्यामुळे या मैदानात फारसे आंतरराष्ट्रीय सामने होत नाहीत. या छोट्याशा, पण सुंदर मैदानात आतापर्यंत केवळ ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले आहेत. यापैकी अखेरचा एकदिवसीय सामना १९९९ विश्वचषकात झाला होता. त्यामुळे टॉन्टनमधील लोक आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा जवळपास २० वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळत आहे. मागील शनिवारीच या मैदानावर बलाढ्य न्यूझीलंड आणि तुलनेने दुबळ्या अफगाणिस्तान या संघांमध्ये सामना झाला.

हा सामना विश्वचषकाच्या इतर सामन्यांप्रमाणे ‘हाय स्कोरिंग’ झाला नाही. या सामन्यात जिमी निशमने पाच विकेट्स घेत अफगाणिस्तानच्या डावाला खिंडार पडल्यामुळे त्यांना अवघ्या १७२ धावाच करता आल्या, ज्याला प्रतिउत्तर देताना न्यूझीलंडने १७३ धावांचे हे लक्ष्य ३३व्या षटकात पूर्ण करत आपला सलग तिसरा विजय मिळवला. या मैदानावर विश्वचषकातील अजून २ सामने (ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बांगलादेश वि. वेस्ट इंडिज) होणार आहेत. टॉन्टन मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे म्हटले जाते. १९९९ च्या विश्वचषकात भारतानेही या मैदानावर सामना खेळला होता. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात सौरव गांगुली (१८३) आणि राहुल द्रविड (१४५) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताने ५० षटकांत ३७३ धावांचा डोंगर उभारला होता. गांगुलीची १८३ धावांची खेळी ही अजूनही या मैदानावरील सर्वोत्तम खेळी आहे. रॉबिन सिंगने ५ विकेट्स घेतल्यामुळे ३७४ धावांचा पाठलाग करणार्‍या श्रीलंकेचा डाव २१६ धावांत आटोपला आणि भारताने हा सामना १५७ धावांनी जिंकला. त्यामुळे या मैदानावर होणार्‍या या विश्वचषकाच्या उर्वरित २ सामन्यांत ३०० हून धावसंख्या उभारण्यात संघांना यश आले तर नवल नाही.

- Advertisement -

१८८२ मध्ये स्थापन झालेले टॉन्टनमधील मैदान छोटे असले, तरी या मैदानाचा इतिहास खूप मोठा आहे. या मैदानाच्या बाजूलाच सेंट जेम्स आणि सेंट मेरी मॅग्डालेन हे दोन प्रचलित चर्च आहेत. सॉमरसेट कौंटीकडून खेळताना याच मैदानावर अनेक महान इंग्लिश खेळाडू घडले आहेत. इंग्लंडचे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणून ओळखले जाणारे इयन बोथम हे सॉमरसेटकडूनच खेळायचे. या मैदानात आता त्यांच्या नावाने एक स्टॅन्डही आहे. तसेच मार्कस ट्रेस्कोथिक, अँडी कॅडीक, जॉस बटलर या सॉमरसेटच्या खेळाडूंनीही इंग्लंडकडून दमदार प्रदर्शन केले आहे. इंग्लंडप्रमाणेच इतर देशांतीलही काही महान खेळाडू सॉमरसेटकडून कौंटी क्रिकेट खेळले आहेत. यातील दोन सर्वात मोठी नावे म्हणजे भारताचे सुनील गावस्कर आणि वेस्ट इंडिजचे व्हीव रिचर्ड्स. सॉमरसेट क्रिकेट क्लबला अजून एकदाही कौंटी चॅम्पियनशिप जिंकता आला नसली, तरी या संघाने स्थानिक एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमधील स्थानिक एकदिवसीय स्पर्धेचे जेतेपद पटकावत १४ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -