घरताज्या घडामोडीभेसळयुक्त इंजेक्शनची विक्री आरोपीस मुंबईतून अटक

भेसळयुक्त इंजेक्शनची विक्री आरोपीस मुंबईतून अटक

Subscribe

कोरोना रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानंतर उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या भेसळयुक्त इंजेक्शन विक्रीप्रकरणी एका मुख्य आरोपीस वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अजय शामलाल नासा असे हा 40 वर्षीय आरोपी असून तो दिल्लीतील गोविंदपुरीचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पंधराहून अधिक भेसळयुक्त इंजेक्शनचा साठा पोलिसांनी जप्त केला असून अशा प्रकारे भेसळयुक्त कोरोनावरील इंजेक्शन विक्रीप्रकरणी दाखल झालेला हा भारतातला पहिला गुन्हा असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.

अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोरोनासाठी उपयुक्त असलेल्या इंजेक्शनची काहीजण जास्त दरात विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर नंदकुमार गोपाळे, संजीव गावडे, सुधीर जाधव, हाक्के, पवार, देवरुखकर यांनी वांद्रे रिक्लेमेशन परिसरातून अजय नासा या व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पंधरा इंजेक्शनचा साठा जप्त केला. तपासात जप्त केलेले इंजेक्शन स्वित्झर्लंड कंपनीकडून भारतात आयात केले जात असून रोश प्रोडक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाते. दिल्लीतून ते बोगस इंजेक्शन काही दिवसांपूर्वी मुंबईत पाठविण्यात आले होते. जुलै 2020 रोजी त्याने गुडगाव येथून काळ्या बाजारात 58 हजार रुपयांचे इंजेक्शन विकत घेतले होते.

- Advertisement -

इंजेक्शन पॅकिंगसाठी वापरलेले हुबेहुब दिसणारे बॉक्स आणि लेबर उत्तरांचल येथून प्रिंट करून आणले, मूळ इंजेक्शन ज्या बॉटलमध्ये पॅक करतात तशा बॉटल विकत घेऊन त्यात डॅक्सोना आणि डेरिफिलन हे अस्थमासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन आणि डिस्टील वॉटरचा वापर करून कोरोनावरील इंजेक्शन म्हणून त्या औषधांची विक्री सुरू केली होती. अशा प्रकारे तो बोगस इंजेक्शनची विक्री करीत होता. एका इंजेक्शनची विक्री तो एक लाख रुपयांमध्ये करीत होता. त्यामुळे काळ्या बाजारात कोरोनावरील कोणत्याही औषधांची खरेदी करू नका, असे आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आले आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत आझम नजीर खान या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती, त्याच्याकडून पोलिसांनी काही इंजेक्शनचा साठा जप्त केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -