घरताज्या घडामोडीयूपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यास कोर्टाचा नकार

यूपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यास कोर्टाचा नकार

Subscribe

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी यूपीएससी पूर्वपरीक्षा नियोजित वेळेप्रमाणेच होणार आहे. ती पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. या परीक्षेसंदर्भात काही उमेदवारांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळून लावली आहे. याचिका फेटाळून लावतानाच कोर्टाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला उमेदवारांच्या निवासासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. परीक्षा देणार्‍या काही उमेदवारांनी न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झाली.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावत याचिका निकाली काढली. ४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा कोरोनाच्या कारणामुळे टाळता येणार नाही, असे सांगत कोर्टाने याचिका निकाली काढली आहे. यावेळी कोर्टाने यूपीएससीलाही महत्त्वाचे निर्देश दिले. आयोगाने सर्व राज्यांना असे निर्देश द्यावेत की, परीक्षा देणार्‍या उमेदवारांना त्यांचे ओळखपत्र दाखवल्यानंतर हॉटेलमध्ये रूम देण्यास परवानगी द्यावी. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग झालेल्या उमेदवारांना परीक्षेला बसू द्यावे, असे कोर्ट आयोगाला सांगू शकत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.

मागील सुनावणीवेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयात उत्तर सादर केले होते. आयोगाने परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा रद्द करणे अशक्य असल्याचे सांगितले होते. यावर कोर्टाने कोरोना काळात ही परीक्षा होत असल्याने आयोगाने काय तयारी केली, याविषयीची माहिती सादर करण्यासही सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -