घरताज्या घडामोडीहाथरसच्या घटनेवरून संतापाची लाट योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा

हाथरसच्या घटनेवरून संतापाची लाट योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा

Subscribe

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या अनन्वित अत्याचार आणि तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

हाथरस येथील तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची घटना मानवतेला कलंकित करणारी आहे. मृत पीडितेच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारही करून दिले नाहीत हे धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

घरातील लोकांच्या गैरहजेरीत भारताच्या पीडित मृत मुलीच्या प्रेतावर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हे योगी सरकारचे अमानवी आणि न शोभणारे कृत्य आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

हाथरसच्या घटनेमधून परत महिलेल्या सुरक्षासंदर्भात उत्तर प्रदेशात भीषण अवस्था समोर आलेली आहे. या घटनेला उत्तर प्रदेश सरकारमध्ये जे लोक जबाबदार आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी. तसेच गुन्हेगारांना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.

- Advertisement -

एका दलित मुलीवर अत्याचार, बलात्कार होतो आणि कोणीही उसळून उठत नाही अशी टीका करताना न्यायासाठी सर्वांनी लढले पाहिजे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या देशात एकेकाळी खंबीरपणे लढणारी दलित चळवळ निस्तेज होताना दिसत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

धर्मनिरपेक्ष जनता दलाने हाथरस घटनेचा धिक्कार केला आहे. या प्रकरणाचा तपास एक महिन्यात पूर्ण करून अपराध्यांना फासावर लटकवावे. तसेच तरुणीच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करणार्‍या पोलिसांनाही निलंबित करून त्यांच्यावरही खटला भरण्यात यावा, अशी मागणी जनता दलचे प्रवक्ते प्रभाकर नारकर यांनी केली आहे.

रिपब्लिकन पक्षाची आज निदर्शने
हाथरस येथे घडलेल्या अमानुष घटनेचा धिक्कार करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आज, गुरुवारी आझाद मैदान येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना फाशी द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले हे २ ऑक्टोबरला हाथरसमधील पीडित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -