कुटुंबियांच्या साथीने दिला कोरोनाशी लढा

प्रज्ञा कांबळे

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मनामध्ये एक प्रकारची भीती होती. आपल्यासोबत कोरोना घरी गेला आणि मुलाला आणि पतीला याची लागण झाली तर असे अनेक प्रश्न मनात येत होते. मात्र माझ्या पतीने मला त्याची जाणीवही होऊ न देता मला एकटे सोडले नाही. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मला हॉस्पिटलमध्ये निर्धास्तपणे काम करता आले. माझा मुलगाही ‘मम्मा’ला त्रास नको म्हणून मी घरी आल्यानंतर व्यवस्थित शारीरिक स्वच्छता केल्यावर माझ्याजवळ येत असे. मला माझ्या कुटुंबियांनी दिलेला पाठिंबा, हॉस्पिटल प्रशासनाकडून झालेले सहकार्य, सहकार्‍यांची झालेली मदत यामुळेच कोरोनाशी लढा देण्यासाठी मला प्रोत्साहन मिळाले.

कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी आमच्या हॉस्पिटलची फारशी तयारी नव्हती. अचानक रुग्ण वाढल्याने आमचाही गोंधळ उडाला. पीपीई कीट, ग्लोव्हज, मास्क ही सुरक्षेची साधने उपलब्ध नव्हती. त्याही परिस्थितीमध्ये आम्ही कामाला सुरुवात केली. प्रशासनाकडून शक्य तेवढे साहित्य आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ग्लोव्हज, सर्जिकल गाऊन हे बर्‍यापैकी उपलब्ध करून दिले. सुरुवातीला पीपीई किटचा पुरवठा नसल्याने आम्ही दिवसाला एकच किट वापरत होतो. परंतु पुरवठा सुरळीत झाल्यावर आम्हाला दिवसाला दोन ते तीन किट मिळू लागले. सुरुवातीला अपुर्‍या साहित्यानिशी कोरोनाचा सामना करताना मनात एक प्रकारची भीती वाटत असे. काय करायचे हे कळत नव्हते. रुग्णांच्या जवळ जायला भीती वाटायची. पण आमच्या सायन हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, आमचे लेक्चरर्स, वरिष्ठ यांच्याकडून आम्हाला कोरोनाविषयी नेमकी माहिती देण्यात येत होती. कोरोना काय आहे, त्याच्यावर कशी मात करायची, स्वत:ची काळजी कशी घ्याल, पेशंटजवळ कसे जायाचे, रुग्णांवर उपचार कसे करायचे याची सविस्तर माहिती त्यांच्याकडून देण्यात येत होती.

नातेवाईकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आम्ही त्यांना वॉर्डमध्ये परवानगी देत नव्हतो. त्यामुळे रुग्णांची संपूर्ण काळजी आम्हालाच घ्यावी लागते. त्यावेळी साधे मास्क, एन 95 मास्क, दोन-तीन ग्लोव्हज घालून जात होतो. पायाच्या नखांपर्यंत आम्ही संपूर्ण झाकलेले असायचो. स्वत:ची सुरक्षा घेत रुग्णांवर कसे उपचार करायचे याचे आम्हाला हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात येत होते. तसेच आमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आम्हाला काही औषधे, अंडी, ओट्स, ड्रायफ्रूट्स व उत्तम दर्जाचे जेवण देण्यात येत होते.

आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होईल. घरात लहान मुलगा आहे. त्याच्या आरोग्याची भीती वाटत होती. त्यामुळे मी हॉस्पिटलमधून घरी आल्यावर पती प्रवीण व मुलापासून दूर राहत असे. घरात वेगळे राहणे, कोपर्‍यात बसून राहणे असे प्रकार माझ्याकडून होऊ लागले. मी घरात असूनही नसल्यासारखी वागत होते. मुलाला जवळ घ्यायची इच्छा होत असे, पण त्याला कोरोनाची लागण होईल या भीतीने मी त्याला जवळ घेत नव्हते. ‘मम्मा’ मला एकदा जवळ घे ना’, असे जेव्हा तो बोलत असे तेव्हा माझ्या ममतेची घालमेल होत असे. मुलाची काळजी वाटत असल्यामुळे मनात मायेची भावना दाटून येत असली तरी मी त्याला दूर ठेवत असे. माझी होत असलेली घालमेल पाहून प्रवीणने मला मानसिक आधार दिला. त्याने मला तू करत असलेले काम हे जनहिताचे आहे. तू एक चांगली गोष्ट करत आहेस, असे सांगत मला धीर दिला. पण हे करतानाच त्याने घरातील जबाबदारीही स्वत:च्या खांद्यावर घेतली. त्याने ऑफिसचे ऑनलाईन काम करत घरातील कामे करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने मुलाला जेवू-खाऊ घालण्यापासून त्याला झोपवण्यापर्यंत सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडली. मी घरी आल्यानंतर प्रवीण स्वत: घरातील फरशी व अन्य परिसर साफ करत असे. मी फ्रेश होईपर्यंत मुलाला माझ्यापासून दूर ठेवत असे.

कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत असताना मला अनेकदा भीती वाटत होती. कोरोनामध्ये विलगीकरणामुळे रुग्णांच्या होणार्‍या मानसिक अस्वस्थेबाबत मी प्रवीणला अनेकदा सांगत असे. त्यामुळे मी जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याने ठामपणे विरोध केला. तू एकटे राहायचे नाही, घरापासून लांब राहायचे नाही, असे सांगत त्यांनी मला निर्णय बदलायला भाग पाडले. कोरोनाच्या काळात पतीने दिलेली ही साथ माझ्यासाठी फार मोलाची ठरली. त्याने घेतलेली घराची जबाबदारी आणि दिलेला धीर यामुळे मला काम करण्यास प्रोत्साहन मिळत होते.

आम्ही जेव्हा या क्षेत्रात येतो. त्यावेळी आम्हाला एक शपथ दिली जाते. त्यामध्ये आम्हाला काहीही झाले तरी रुग्ण व्यक्तीवर आम्हाला उपचार करायचे असतात. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना आम्हाला या शपथेची आठवण होती. आमची तशीच मानसिकता होती. ती व्यक्ती आमच्या नात्यातील असो किंवा कोणी असो. आपल्या माणसासाठी सर्वच करतात. पण जो आपल्या नात्यातील नसतो आणि तो बरा होऊन घरी जातो, तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरील हास्य पाहिल्यानंतर आम्हाला होणारा आनंद हा वेगळाच असतो. कोरोनामध्ये शहरातील विविध सोसायट्यांमधून डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांना प्रवेश दिला जात नसे. पण माझ्या इमारतीमध्ये मला वेगळाच अनुभव आला. आमच्या इमारतीत हॉस्पिटलमध्ये काम करणारे आम्ही तिघेजण आहोत. आम्हा तिघांचा इमारतीमधील नागरिकांकडून सत्कार करण्यात आला. आम्ही करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कोरोना संपला आहे, असे म्हणता येणार नाही. पण प्रत्येकाने स्वत:च्या सुरक्षेविषयी सजग राहणे आवश्यक आहे. आपण मास्क वापरण्याबरोबरच हात, पाय, तोंड धुतल्यानंतर घरात वावरावे. मास्कही व्यवस्थित धुवावे, प्रत्यकेवेळी एन 95 मास्क वापरलाच पाहिजे असे नाही. पण कापडी मास्क वापरला पाहिजे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, असे मी ‘आपलं महानगर’च्या माध्यमातून सर्वांनी सांगू इच्छिते.