घरताज्या घडामोडीनियोजनाची वाट : महाडला सातत्याने पूर येणार्‍या जागेतच बांधणार घरं

नियोजनाची वाट : महाडला सातत्याने पूर येणार्‍या जागेतच बांधणार घरं

Subscribe

महाडमध्ये दरवर्षी अनेक इमारती पाण्याखाली

शहरासह संपूर्ण तालुक्यात यावर्षी महापुराने विळखा घातला. यामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर सातत्याने पूर येणार्‍या भागात बांधकामे कशी होतात, असा कळीचा मुद्दा पुढे आला आहे. सन २००५ नंतर पूररेषा निश्चित केली गेली असून, यावर्षी आलेल्या पुरामध्ये या इमारती किमान ७ दिवस पाण्याखाली राहून मानवी जीविताला धोका निर्माण झाला होता. दिवसा पाणी आल्याने सुदैवाने मानवहानी झाली नाही, मात्र कष्टाच्या पैशातून घर घेताना पूर भागात घर घेताना काळजीही घेणे गरजेचे झाले आहे.

गेल्या २२ जुलै रोजी पुराने हाहाकार माजवला होता. यामुळे शासकीय नियम आणि आपत्कालीन यंत्रणा, तसेस शासकीय निघणारे धिंडवडे याबाबत अनेक प्रश्न समोर आले आहेत. शहराला सावित्री नदीने वेढा दिलेला आहे. रायगड आणि वाळण भागातून गांधारी आणि काळ नद्या सावित्रीला येऊन मिळतात. किल्ले रायगड परिसर, वरंध विभाग आणि महाबळेश्वर या तीनही ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक आहे. या भागातून येणारे पाणी थेट सावित्री नदीला मिळते आणि शहरात पुराचे तांडव सुरू होते. यामुळे सन २००५ सह २०२१ मध्ये पुराच्या पाण्याने नुकसान झाल्याचे पहावयास मिळत आहे. लोकसंख्या वाढत असताना विस्ताराला पुरेशी जागा शिल्लक राहिलेली नाही. उर्वरित दस्तुरी नाका, कोटेश्वरी, पंचशील नगर, शेडाव नाका, गांधारी आदी भाग हे दर पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली असतात. शिवाय या भागातील अनेक जमिनी या आरक्षित आहेत.

- Advertisement -

असे असले तरी नियम आणि अटी धाब्यावर बसवून या भागात इमारती उभ्या करण्याचे काम केले जात आहे. शहरातील दस्तुरी नाका ते नाते खिंड हा भाग सतत पाण्याखाली असून देखील या ठिकाणी भौगोलिक स्थितीचा आढावा न घेताच इमारत परवाने जिल्हाधिकारी आणि नगर रचना विभागाने दिल्या आहेत. यामुळे या भागात बांधकाम करण्यात आलेल्या इमारती किमान ७ दिवस पुराच्या वेढ्यात सापडल्या जातात. हिच स्थिती ग्रामीण भागात देण्यात आलेल्या परवान्यांबाबत देखील निर्माण झाली आहे. शहराजवळ असलेल्या शिरगाव गावाच्या सखल भागात ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते त्या ठिकाणी इमारती उभ्या रहात आहेत. महाड-रायगड मार्गावर नातेखिंड ते लाडवली दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या इमारती देखील पुरात सापडल्या होत्या.

याच परिसरात रुग्णालयांना देखील परवाने दिले आहेत. वारंवार येणार्‍या पुरामध्ये रुग्णालयातून रुग्णांना होडीतून स्थलांतर करण्याची पाळी पालिका आणि आपत्ती व्यवस्थापनावर येते. नाते खिंड ते लाडवली हा भाग संपर्काच्या बाहेर जातो. अशा स्थितीत इमारतीमध्ये नागरिक सापडल्यास त्याची जबाबदारी मात्र प्रशासनावर येते आणि बांधकाम व्यावसायिक मात्र उघड्या डोळ्यांनी सुरक्षित ठिकाणी राहून मजा बघत असतो. गांधारी नाका या ठिकाणी पूर भागातच इमारती उभ्या राहिल्या आहेत. गांधारपाले आणि साहिलनगर येथे तर डोंगर भागात बांधकामे होत आहेत. अशीच परिस्थिती शेडाव नाका, बिरवाडीमध्ये आहे.

- Advertisement -

इमारत बांधकाम परवाने देताना नगरविकास, नगर रचना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरातील पूर रेषा आणि त्या ठिकाणी बांधकामे होत असतील तर थांबवणे गरजेचे आहे. यावर्षी ऐन पूर काळात त्या भागातील नागरिकांना सुविधा आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता पूर रेषा आणि देण्यात येणारे बांधकाम परवाने याबाबत विचार होणे काळाची गरज बनली आहे. जलसंपदा विभागाने पूर रेषा आखणी केली असली तरी ती आजही कागदावरच आहे. गेल्या वर्षापासून बांधकाम परवाने देताना जलसंपदा विभागाची परवानगी घेतली जाते, असे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही; राणेंचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -