घरताज्या घडामोडीशेतकर्‍यांचा भारत बंद शांततेत !

शेतकर्‍यांचा भारत बंद शांततेत !

Subscribe

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांनी पुकारलेला बंद मंगळवारी महाराष्ट्रासह देशभरात शांततेत पार पडला. मुंबई, ठाणे यांसारख्या राज्यातील मोठ्या शहरांमध्ये बंदला अल्प ते समिश्र प्रतिसाद मिळाला असताना विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने बंदला पाठिंंबा दिला होता.काँग्रेसने राज्यात अनेक ठिकाणी आपल्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही अनेक ठिकाणी निदर्शने केली. भारत बंदची तीव्रता लक्षात घेऊन शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांसोबत रात्री सात वाजता पुन्हा चर्चा केली. यावेळी शेतकरी संघटनेचे १३ प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईमध्ये अल्प प्रतिसाद

नव्या कृषी कायद्यासंदर्भात सरकार व शेतकरी यांच्यामध्ये 13 दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. या चर्चांमधून तोडगा निघत नसल्याने अखेर 8 डिसेंबरला शेतकर्‍यांनी ‘भारत बंद’चे हत्यार उपसले. या बंदला राज्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला तरी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांकडून आंदोलने व निदर्शने करण्यात आली. तसेच दुकाने, भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले होते. मात्र, मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन, बेस्ट बस, रिक्षा आणि टॅक्सी सुरू असल्याने मुंबईमध्ये बंदला अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिसर, मालाड, कांदिवली परिसरात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्यावतीने शेतकर्‍यांच्या विरोधात जे विधेयक संमत करण्यात आले ते परत घेण्यात यावे. तसेच ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी झाले होते. मुंबईत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचा असलेला सायन-पनवेल महामार्ग आंदोलकांनी मंगळवारी सकाळी तीन वेळा रोखला. त्यामुळे या मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. छात्रभारती व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दादर रेल्वे स्टेशन परिसरात भारत बंदला समर्थन करत सरकारचा निषेध नोंदवला. छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दादर रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मुंबईच्या मालाड, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, डीवायएफआय यांच्यातर्फे आंदोलने करण्यात आली.

- Advertisement -

मुंबईच्या डब्बेवाल्यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शविला होता. मुंबईतील महत्त्वाच्या बाजारपेठा असलेल्या दादर, क्रॉफर्ट मार्केट, कुर्ला, वांद्रे या भागातील दुकानदारांनी दुकाने बंद ठेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. मेडिकल स्टोर्स वगळता फारशी कोणती दुकाने सुरू असल्याचे दिसून आली नाहीत. भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी एपीएमसी बाजारांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला. एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवल्या होत्या. नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकर्‍यांसोबत माथाडी कामगारांचाही रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी कामगारही बंदमध्ये सहभागी झाले होते. मरीन ड्राईव्ह येथे मानवी साखळी तयार करून शांततेत विरोध प्रदर्शन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यामुळे त्यांना प्रदर्शन करता आले नाही. मात्र, त्याचवेळी नवी मुंबईमध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया नवी मुंबई ट्रान्सपोर्ट आणि गुरुद्वारातर्फे कार आणि बाईक रॅली काढण्यात आली.

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा, बेस्ट, टॅक्सी, रिक्षा, मोनो, मेट्रोच्या सेवा सुरळीत सुरू होत्या. परिणामी मुंबईतील सरकारी व खासगी कार्यालये सुरू होती. मंत्रालय, मुंबई महापालिका, आरोग्य भवन, बांधकाम भवन या सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. वाहतूक सेवा सुरू असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत होती. त्यामुळे मुंबईतील दुकानदारांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी कामगार वर्गाने मात्र कार्यालयांमध्ये हजेरी लावल्याने मुंबईमध्ये शेतकर्‍यांच्या संपाला अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला.

- Advertisement -

देशात शांततेत बंद

कृषी कायद्यांवरून शेतकर्‍यांनी पुकारलेला भारत बंद मंगळवारी शांततेत पार पडला. बंदमुळे देशातील काही राज्यांमध्ये जनजीवन प्रभावित झाले. दुकाने आणि आस्थापने बंद होती. तसेच वाहतूकही प्रभावित झाली होती. आंदोलनकर्त्यांनी मुख्य रस्ते आडवल्याचे दिसून आले. बंदचा प्रभाव पंजाब, हरयाणा, दिल्ली राज्यात मोठ्या प्रमाणात जाणवला. बिहारमध्ये तुरळक ठिकाणी बंद होता. तर उत्तर प्रदेशात बंदला अल्पप्रतिसाद मिळाला. राजस्थानमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. मात्र दुकाने, आस्थापने सुरू होती. मध्य प्रदेशातील काही भागात बंद पाळण्यात आला होता. गुजरातमध्ये बंदला अल्पप्रतिसाद मिळाला. तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र येथे दुकाने, आस्थापने सुरू होती. पश्चिम बंगलामध्ये बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. येथे काही ठिकाणी रेल्वे रोखण्यात आल्या. कर्नाटकात बंदचा प्रभाव जाणवला नाही. ओरिसात आंदोलनकर्त्यांनी मुख्य महामार्गावर निदर्शने केली. काँग्रेसाशासित छत्तीसगडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबद या मुख्य शहरांमध्ये समिश्र प्रतिसाद मिळाला. आसाममध्ये दुकाने बंद होती. तेलंगणात जनजीवन सामान्य होते. गोवा, हिमाचल प्रदेश, मेघालय, अरुणाचल प्रदेशात बंदचा प्रभाव जाणवला नाही.

ठाणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेले अनेक दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. या शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला ठाणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ठाण्यासह नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये बंदचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. ठाणे भाजी बाजार पेठ सकाळी ११ वाजल्यानंतर बंद झाली. तर आंदोलनाच्या समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी ट्रॅक्टर, नांगर घेऊन शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभाग घेऊन कृषी कायद्याची होळी केली. तर वर्तकनगर, शास्रीनगरात कडकडीत बंद पाळला. तसेच वंचित आघाडीने ठाणे स्टेशन परिसरातील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. तर पनवेलमध्ये बंदला पहाटेपासूनच सुरुवात झाली. महाविकास आघाडीने दिलेल्या बंदच्या हाकेला व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. तसेच मुंब्रा कौसात राष्ट्रवादी-काँग्रेसने ट्रॅक्टर मोर्चा काढून निषेध दर्शवला. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष व शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. अंबरनाथमध्येही भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये अंबरनाथ शहर सहभागी झाले होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्यावतीने दोन्ही शहरात बंदची हाक देण्यात आली. भिवंडीतील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी आणि तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या अंबाडी नाका येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपतींना भेटणार

केंद्रीय कृषी कायद्यांबाबत मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या समवेत पाच पक्षांचे नेते उद्या, बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांमध्ये असणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे पाच नेते उद्या संध्याकाळी पाच वाजता भेटणार आहेत. कोविड प्रोटोकॉल असल्याने पाच नेत्यांनाच भेटण्याची संमती राष्ट्रपतींनी दिली आहे. सीताराम येचुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींसोबत होणारी ही भेट कृषी कायद्यांसंदर्भात असणार आहे. गेल्या १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. मंगळवारी शेतकर्‍यांनी भारत बंदचीही हाक दिली होती. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या विचारांचे पक्ष, शिवसेना या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला. आता बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंबंधीची चर्चा केली जाणार आहे.

मालवाहतूकदारांचे २ हजार कोटींचे नुकसान

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शवत मंगळवारी मालवाहतूकदारांनी देशभरात आपली सेवा स्थगित ठेवली. त्यामुळे मालवाहतूकदारांचे सुमारे 2 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मालवाहतूकदार सेवा स्थगित ठेवणार असल्याची माहिती याआधीच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या त्यांच्या संघटनेकडून देण्यात आली होती. संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार सुमारे 90 लाख ट्रक, टेम्पो, ट्रेलर भारत बंदच्या दिवशी धावले नाहीत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मालवाहतूकदारांनी देशभरातील विविध ट्रक टर्मिनल्सवर निदर्शने केली. मालवाहतूकदारांनी बंदला दिलेला पाठिंबा यशस्वी ठरला, असे त्या संघटनेकडून सांगण्यात आले. कृषी क्षेत्र म्हणजे देशाची जीवनरेषा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्या संघटनेने म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -