घरताज्या घडामोडीमहाड नगर परिषदेच्या सभागृहाला माणिकराव जगताप यांचे नाव

महाड नगर परिषदेच्या सभागृहाला माणिकराव जगताप यांचे नाव

Subscribe

महाड येथील नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील सभागृहाला माजी आमदार कै. माणिक जगताप यांचे नाव देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. या सभागृहाला माजी नगराध्यक्ष कै. सुधाकर सावंत यांचे नाव देण्याबाबत शिवसेनेने भूमिका घेतली होती. परंतु या सर्व सदस्यांनी आपली मागणी मागे घेत जगताप यांचे नाव देण्याबाबत पाठिंबा दर्शविला.

नगर परिषदेच्या नव्या इमारतीमध्ये सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष सपना बुटाला, मुख्याधिकारी महादेव रोडगे उपस्थित होते. सभेमध्ये पालिका सभागृहाला माणिक जगताप यांचे नाव देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सभागृहाला माजी नगराध्यक्ष सावंत यांचे नाव दिले जावे अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आलेली होती. त्यामुळे प्रारंभी सभागृहाला जगताप यांचे नाव न देता सावंत यांनी शहरासाठी केलेल्या विकास कामाचा विचार करून त्यांचे नाव दिले जावे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल, नगरसेवक चेतन पोटफोडे, दीपक सावंत, चेतन सुर्वे या सदस्यांनी मांडली. यावेळी नगराध्यक्षा जगताप यांनी सावंत यांचे कार्य मोठे आहे, त्यांच्याच नेतृत्त्वाखाली माणिक जगताप देखील काम करीत आल्यामुळे भविष्यात पालिकेकडून होणार्‍या एखाद्या मोठ्या वास्तुला सावंत यांचे नाव निश्चित दिले जाईल, असे सांगितले. सभागृहामध्ये आपले वडील माणिक जगताप यांच्या आठवणीने नगराध्यक्षा जगताप यांना अखेर रडू कोसळले.

- Advertisement -

त्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी आपली भूमिका मागे घेत माणिक जगताप यांच्या नावाला आपला पाठिंबा दर्शविला. या सभेमध्ये शहरातील विविध विकास कामे आणि समस्यांबाबत देखील चर्चा करण्यात आली. सुनील अगरवाल यांनी कोरोनाचा काळ आणि पूर परिस्थिती लक्षात घेता कोल्हापूर महानगर पालिकेच्या धर्तीवर नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी अथवा दंडात्मक रक्कम माफ करावी असा मुद्दा उपस्थित केला. तर नगरसेवक संदीप जाधव यांनी पुरामुळे घरे कोसळल्याने बेघर झालेल्यांना तळीयेप्रमाणे म्हाडाकडून खास बाब म्हणून घरे देण्याची मागणी केली. दीपक सावंत यांनी विरेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला. या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर हे काम सुरू करण्यात येईल, असे नगर अभियंता सुहास कांबळे यांनी सांगितले.


हे ही वाचा – VIDEO : श्रद्धा कपूरने महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांवर व्यक्त केलं दु:ख

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -