घरताज्या घडामोडीपर्यटक, शैक्षणिक संहलींनी रायगड किल्ला गजबजला ; स्वच्छतागृहाअभावी महिलांचे हाल

पर्यटक, शैक्षणिक संहलींनी रायगड किल्ला गजबजला ; स्वच्छतागृहाअभावी महिलांचे हाल

Subscribe

ऐतिहासिक रायगड किल्ला पाहण्यासाठी आता शैक्षणिक सहलींची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना काळातील संचारबंदीनंतर आता शैक्षणिक सहली आणि पर्यटक रायगडावर दाखल होत आहेत. एकीकडे राष्ट्रपतींसाठी करोडो रुपयांच्या सुविधा अवघ्या काही दिवसात निर्माण केल्या, मात्र गडावर येणार्‍या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा देता आली नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहत. स्वच्छतागृहाअभावी तर महिला आणि विद्यार्थिनींचे प्रचंड हाल होत आहेत.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे स्थळ असलेल्या रायगडावर येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. गेले काही महिने संचारबंदीमुळे पर्यटकांना गड, किल्ले बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने आता गड, किल्ले पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. गेले दोन दिवस रायगडावर प्रचंड गर्दी झाली. पर्यटक, शिवप्रेमी आणि विद्यार्थी आता गडावर दाखल होऊ लागले आहेत. यामुळे पुन्हा रायगड ‘बोलका’ झाला आहे. चित्त दरवाजा आणि रायगड रोप वे अशा दोन्ही बाजूने शिवप्रेमी गडावर जात असल्याने पायथ्याशी वाहनांची पार्किंग करण्यास जागा अपुरी पडते. शासनाने किल्ल्याचा परिसर आणि गड विकासित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी ६०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून किल्ला आणि सभोवतालच्या परिसरामध्ये असंख्य अडचणी असताना शासनाला त्या सोडविण्यात पूर्णपणे अपयश आल्यामुळे येणार्‍या हजारो पर्यटकांना अनंत अडचणीना सामोरे जावे लागत आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान शैक्षणिक सहली आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. दिवसाला किमान ३० ते ४० मोठ्या बसेस दाखल होत असतात. अनेकजण रोप वेचा, तर बाकीचे पायी जाण्याचा पर्याय निवडतात. यामुळे आधीच अरूंद असलेल्या पायथ्याच्या मार्गावर वाहन कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठी वाहने आणि छोट्या कार पार्क केल्या जात असल्याने वाहन कोंडी होत आहे. यामुळे दैनंदिन एसटीच्या गाड्यांना या वाहन कोंडीतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.

रायगड पाहण्यासाठी गेलेले विद्यार्थी किंवा पर्यटक आपली वाहने लावून जात असल्याने त्यांना हलविणे कठीण असते. पूर्ण दिवस ही वाहने अशाच पद्धतीने उभी राहत असल्याने कोंडी होत आहे. याकरिता स्थानिक पोलीस कर्मचारी वाहतूक नियोजन करण्यासाठी असणे गरजेचे आहे.

- Advertisement -

रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली धर्मशाळा प्रशस्त आहे. मात्र याची दुरवस्था प्रशासनाने केली आहे. महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून, येथे देखरेख करण्यासाठी कर्मचारीसुद्धा उपलब्ध नाहीत. या धर्मशाळेची दुरवस्था झाल्याने शैक्षणिक सहलींना राहण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. स्वच्छता नसल्याने कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृह देखील नादुरुस्त झाले असून, पाण्याची सुविधा उपलब्ध नाही.

रायगड परिसरात पायथ्याशी आणि चित्त दरवाजाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालयांची सुविधा नसल्याने शालेय सहलीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पायथ्याशी असलेल्या खासगी हॉटेलमधील स्वच्छतागृहात पैसे मोजावे लागत आहेत. चित्त दरवाजा परिसरामध्ये येणार्‍या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय तर नाहीच, परंतु या भागामध्ये येणार्‍या हजारो पर्यटकांना स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावरच प्रात:विधी उरकावा लागतो. त्यामुळे चित्त दरावाजा परिसरामध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

एकीकडे देशाचे राष्ट्रपती किल्ले रायगडाला भेट देणार म्हणून प्रशासनाने स्थानिक समस्या लपवून ठेवण्यासाठी करोडो रुपयांची तरतूद करीत रस्ते, पाणी आणि दूरध्वनी यंत्रणा आदी बाबी तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ उपलब्ध करून दिल्या. मात्र गेले अनेक वर्षे रायगड परिसरातील नागरिकाना आणि पर्यटकांना भेडसाविणार्‍या समस्या सोडवण्यास शासनाकडे पैसे नसल्याचे दिसून येत आहे.

 वार्ताहर :- नीलेश पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -