पत्नीच्या शिरच्छेदामागे संशयाचे भूत ; माथेरानमधील हत्येचा गुन्हा २४ तासात उघड

Murder case in Matheran revealed in 24 hours
पत्नीच्या शिरच्छेदामागे संशयाचे भूत ; माथेरानमधील हत्येचा गुन्हा २४ तासात उघड

शिरच्छेद करून महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा रायगड पोलिसांनी २४ तासात लावला. महिलेचा शिरच्छेद करणारा हा तिचाच पतीअसून, त्याच्या मुसक्या आवळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हत्या करताना आरोपीने कोणतेही पुरावे मागे ठेवले नव्हते. मात्र एका प्रिस्क्रीप्शनच्या आधारे शोध घेत आरोपीचा पिच्छा पुरवण्यात आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये एका अज्ञात इसमाने सोबत आलेल्या महिलेचे धडापासून शीर उडवून निर्घृण हत्या केल्याची घटना माथेरानमधील इंदीरा गांधी नगर येथील एका खासगी लॉजवर १२ डिसेंबरच्या पहाटे घडली होती. या घटनेतील मृत महिलेची ओळख पटता न यावी यासाठी आरोपीने घटनास्थळावरील सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सदर महिलेला निर्वस्त्र करुन तिच्या कपड्यांसह पर्स तसेच तिचे शिर घेऊन पसार झाला होता.

प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने माथेरान पोलिसांना तपासात खूप अडथळे येत होते. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर तसेच या घटनेचे तपास अधिकारी माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर व त्यांच्या सहकार्‍यांनी या घटनेचा २४ तासाच्या आत उलगडा केल्याने माथेरानसह रायगड पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

रविवारी (१२ डिसेंबर) माथेरान येथील एका लॉजमध्ये गोरेगावच्या तरुणीचा शिरच्छेद करून खून करणार्‍या पतीला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव पूनम पाल (२६) असे आहे. ती पनवेल येथील खांदा कॉलनी येथे पती राम पाल यांच्यासोबत राहत होती असे समजते. यावर्षी मे महिन्यात या जोडप्याने अरेंज मॅरेज केले होते. मूळचे उत्तर प्रदेशचे, दोघेही मुंबईतच लहानाचे मोठे झाले. मृत महिला एका खाजगी दवाखान्यात परिचारिका होती, तर तिचा पती एका खाजगी कंपनीत आयटी अभियंता होता. लग्नाच्या सुरुवातीपासूनच तिच्या पतीचा तिच्या चारित्र्यावर संशय होता.विवाहबाह्य संबंध असल्याचे निमित्त करत तो तिच्यावर पाळत ठेवत असे. आरोपी हा त्याच्या पत्नीपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे, ज्याची आम्ही अद्याप पडताळणी करू शकलो नाही, असे रायगडचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.

शनिवारी संध्याकाळी, जोडप्याने माथेरानच्या लॉजमध्ये प्रवेश केला होता. आणि रविवारी पहाटे त्याने बाथरूममध्ये पत्नीची हत्या करत तिचा शिरच्छेद केला. आरोपींनी पत्नीचे शीर दरीत फेकल्याचा दावा केला होता. आणि आमची टीम त्याचा शोध घेत होती. मुंबई पोलिसांसह एकूण पाच टीम या प्रकरणावर काम करत असल्याची माहिती दुधे यांनी दिली. लॉज धारकाने या जोडप्याचे कोणतेही ओळखपत्र घेतले नव्हते. यामुळे त्यांच्याविषयी माहिती मिळवण्यात अडचणीत येत होत्या.

मात्र तपासाच्या दरम्यान लॉजपासून काही मीटर अंतरावर मृत तरुणीची एक पर्स सापडली. ज्यामध्ये प्रिस्क्रिप्शन होते. हे प्रिस्क्रिप्शन गोरेगावच्या एका क्लिनिकचे होते. या मुलीचे पालकही गोरेगावमध्येच राहतात. तपासात पोलिसांनी माथेरान प्रवेश द्वारावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांचा चेहरा कोविड-मास्कसह टिपला गेला होता. याशिवाय प्रिस्क्रिप्शनच्या मदतीने मुलीची ओळख पटली. या आधारे तपास अधिकार्‍यांनी तिच्या पतीला खांदा कॉलनीतून ताब्यात घेतले आहे.आरोपी राम पाल याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घटनास्थळापासून काही अंतरावर जंगल सदृश्य दरीत त्या मृत तरुणीचे शीर आणि तिची काळी बॅग फेकली. माथेरान पोलिसांनी शीर आणि बॅग जंगलातून ताब्यात घेतली. महिलेचा मृतदेह रविवारी सायंकाळी पनवेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनानंतर शीतगृहात ठेवण्यात आला असुन तो तिच्या नातलगांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलीस अधीक्षक दुधे यांनी स्पष्ट केले.

  वार्ताहर – दिनेश सुतार