Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जगण्यासाठी आता दरडग्रस्तांचा संघर्ष...

जगण्यासाठी आता दरडग्रस्तांचा संघर्ष…

२२ जुलै रोजीच्या अतिवृष्टीने एकाच कुटुंबातील चौघे आणि एका पाहुण्याचा गावामागील डोंगराने घात केला होता.

Related Story

- Advertisement -

पोलादपूरमध्ये अतिवृष्टीच्या तांडवात दरड कोसळून हाहाकार माजलेल्या तालुक्यातील केवनाळे गावात एक प्रकारचा सन्नाटा पसरलेला आहे. भेदरलेले सर्वजण शुन्यात नजर लावून बसले आहेत. वारंवार येणाऱ्या अशा संकटांचा सामना कसा करायचा या विचारात अनेकजण आहेत. किंबहुना त्यांचा आता जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. २२ जुलै रोजीच्या अतिवृष्टीने एकाच कुटुंबातील चौघे आणि एका पाहुण्याचा गावामागील डोंगराने घात केला होता. ८ घरे कोसळलेल्या दरडीखाली भुईसपाट झाली आणि हसत्या-खेळत्या गावावर शोककळा पसरली. प्रस्तुत वार्ताहराने तेथील परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी गावात प्रवेश करताच सरपंच बबिता अनिल दळवी आणी काही ग्रामस्थ ओसरीवरून उठून पुढे आले. त्यांनी माहिती दिली.

हळदुले आणि दाभिळ गावांमधील डोंगरांचा मोठा भाग खाली रस्त्यावर आला आहे. अर्धा किलोमीटर लांबी असलेल्या या दरडीने रस्ता गायब केला आहे. ही गावे जीव मुठीत घेऊन दिवस ढकलत आहेत. या गावांतील विहिरी मातीने बुजल्या असून, मोठ्या प्रमाणावर शेतीची हानी झाली आहे. लागवड केलेल्या भातशेतीची दरडीने अक्षरश: माती केली आहे.
त्यामुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ज्यावर पोट भरते ती शेतीच नष्ट झाली असल्याने शासनाने केवनाळे गावाचे इतरत्र स्थलांतर करून पुनर्वसन करावे आणि नष्ट झालेली शेती पुन्हा लागवडी योग्य करण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी दळवी यांनी मागणी केली आहे. या घडीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, ग्रामस्थांना ओहाळातून वाहाणाऱ्या पाण्याचा वापर नाईलाजास्तव करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने पाण्याचा प्रश्न जिल्हा परिषदेने मार्गी लावावा, अशीही मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्ते, पूल, साकव, मंदिर, घरे यांची प्रचंड प्रमाणावर हानी झाली आहे. त्याचबरोबर सावित्रीच्या पुराने पोलादपूर शहराचा काठालगतच्या वस्त्यांमधील घरे साफ धुवून नेल्याने रहिवाशी सर्व काही गमावून बसले आहेत. व्यापाऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले असून, काडी-काडी गोळा करून उभा केलेल्या संसाराची माती केल्याने ना खायाला दाणा, घालायला कपडा, प्यायला पाणी, ना खिशात दमडी, ना राहायला निवारा अशा केविलवाणी अवस्था अनेकांची झाली आहे. स्वयंसेवी, सामाजिक संस्था आणी दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू झालायं, पण त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी मदत करून आधार देण्याची खरी गरज आहे. १५ वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत तालुक्याची अपरिमित हानी झाली होती.

त्यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रस्ता खचला होता. डोंगर माथ्यापासून पायथ्यापर्यंत मोठमोठ्या भेगा गेल्या होत्या. त्यावेळी भूवैज्ञानिक आणि भूजल शास्रज्ञांनी पाहाणी केली. त्यानंतर कशेडी घाटाचा परिसर भुस्खलनाचा असल्याचे जाहीर केले होते. तज्ज्ञांच्या अहवालानुसार या डोंगराळ तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने दूरदृष्टीने अशा दरडीच्या दुर्घटना डोंगर रांगांमध्ये घडू शकतात याचा विचार न करता दरवर्षी संभाव्य दरडग्रस्त गावांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे धोरण अवलंबिले.

- Advertisement -

दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडू नयेत याकरिता काही कठोर पावले उचलण्याची गरज असून, नद्यांतील गाळ उपसण्याला प्राधान्य दिले पाहिजेे. असे केले तर आणि तरच कुठेतरी दिलासा मिळेल, अन्यथा नेमेची येतो पावसाळा, या उक्तीप्रमाणे संकटे येती नेमेची, अशी परिस्थिती होईल.

 – बबन शेलार 


हेही वाचा – Tokyo Olympics : सिंधूची विक्रमी कामगिरी; बिंगजिओवर मात करत ‘कांस्य’ कमाई

- Advertisement -