Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम गुजरातच्या पुरुष मॉडलवर ठाण्यात सामूहिक अत्याचार

गुजरातच्या पुरुष मॉडलवर ठाण्यात सामूहिक अत्याचार

याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.   

Related Story

- Advertisement -

मॉडेलिंग करणाऱ्या गुजरातमधील एका १९ वर्षीय तरुणावर ठाण्यात चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तसेच दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी दिली.

गुजरातमध्ये राहणारा १९ वर्षांचा पीडित तरुण हा मॉडल आहे. त्याचे काही नातेवाईक ठाणे येथे राहण्यास असल्याने तो अधूनमधून त्यांना भेटण्यासाठी येत असतो. या पीडित तरुणाचे फेसबुकवरील काही मित्र ठाण्यात राहणारे आहेत. याच मित्रांपैकी पुनीत शुक्ला (२६) याला पीडित तरुण ठाण्यात आल्याचे कळले. त्याने रविवारी रात्री पीडित तरुणाला भेटण्यासाठी साठे नगर येथील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या एका कंपनीजवळ बोलावले. पीडित तरुण त्या ठिकाणी आला असता पुनीत आणि त्याच्यासोबत आलेल्या एका तरुणाने पीडिताला बंद पडलेल्या कंपनीच्या गच्चीवर नेले.

- Advertisement -

त्याठिकाणी काही वेळातच आणखी दोन तरुण आले. त्यांनी पीडित तरुणाला बांबूने मारहाण करून त्याच्यावर तिघांनी अनैसर्गिक सामूहिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार पुनीतने आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला. या चौघांनी पीडित तरुणाला आणखी मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल फोन आणि ६ हजार रुपयांची रोकड लुटली. तसेच याबाबत पोलिसात तक्रार केल्यास व्हिडिओ फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन चौघेही तेथून पसार झाले. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणाने दुसऱ्या दिवशी हिम्मत करून वागळे इस्टेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

पोलिसांनी ताबडतोब चार जणांविरुद्ध अनैसर्गिक सामूहिक अत्याचार आणि मारहाण करून लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. मंगळवारी पुनीत शुक्ला याला ठाण्यातील श्रीनगर परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती दत्तात्रय ढोले यांनी दिली. तसेच आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे ढोले यांनी सांगितले.

- Advertisement -