घरदेश-विदेशभारताच्या मदतीला अमेरिका आली धावून; Remdesivir च्या १,२५,००० कुपी भारतात दाखल

भारताच्या मदतीला अमेरिका आली धावून; Remdesivir च्या १,२५,००० कुपी भारतात दाखल

Subscribe

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, दररोज भारतात तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांचा जीव देखील जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी जगातील काही देश पुढे सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या मदतीला अमेरिका देखील धावून आली आहे. सोमवारी सकाळी अमेरिकेतून भारतात विमान दाखल झाले असून यामध्ये कोरोनासोबत लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील रेमडेसिविरचा तुटवडा कमी करण्यासाठी अमेरिकेकडून पाठविण्यात आलेल्या रेमडेसिविरच्या १ लाख २५ हजार कुपी सोमवारी दिल्ली विमानतळावर दाखल झाल्या आहेत. तर कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी भारतीय हवाई दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. भारतीय हवाई दलाच्या सी -१७ विमानाने ४ क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स जर्मनीहून उड्डाण करत हिंडन विमानतळावर पोहोचले असून या व्यतिरिक्त ४५० ऑक्सिजन सिलिंडर्सही यूकेमधून विमानाने चेन्नईच्या विमानतळावर आणले असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

- Advertisement -

उद्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्हर्च्युअल बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी ब्रिटनने आणखी १००० व्हेंटिलेटर भारतात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या गंभीर कोरोना रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. तर गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रिटनने २०० व्हेंटिलेटर, ४९५ ऑक्सिजन कंसनट्रेटर्स आणि ३ ऑक्सिजन जेनेरेशन युनिट देखील देणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

यासह अमेरिकेच्या हवाई दलाचे सुपर गॅलॅक्सी विमान गेल्या शुक्रवारी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य आणि १० लाख रॅपिड कोरोना टेस्ट किट पाठवण्यात आले होते. या संदर्भातील भारतातील अमेरिकी दुतावासाने ट्विट करत म्हटले होते की, “अमेरिकेतून आणीबाणीच्या कोविड संकटाशी लढण्यासाठी मदतीची पहिली खेप भारतात आली आहे. ७० वर्षांपासून दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करत असून कोरोनाशी लढा देण्यासाठी अमेरिका खंबीरपणे भारताच्या पाठीशी आहे”.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -