Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, अवघ्या 18 मिनिटांत दोन मोठे हादरे

अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, अवघ्या 18 मिनिटांत दोन मोठे हादरे

Subscribe

काबूल : अफगाणिस्तानात गुरुवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. अवघ्या 18 मिनिटांत दोन मोठे हादरे अफगाणिस्तानला बसले. पहिल्यांदा भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली, तर दुसऱ्यांदा भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर स्केल होती. याशिवाय ताजिकिस्तानमधील मुर्गोबपासून 67 किमी पश्चिमेला 6.8 रिश्टर स्केलचा भूकंपही झाला. काल, बुधवारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.

- Advertisement -

अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये गुरुवारी सकाळी 6.07 आणि 6.25 वाजता भूकंप झाला. पहिल्या धक्क्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून 113 किमी आणि दुसऱ्या धक्क्याचा केंद्रबिंदू 150 किमी खोल होता.

याशिवाय ताजिकिस्तानमध्ये देखील गुरुवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानमध्ये स्थानिक वेळेनुसार पहाटे 5.37 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी होती. मात्र चीनच्या माध्यमांनी भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल असल्याचे म्हटले आहे. भूकंपानंतर सुमारे 20 मिनिटांनी 5.0 रिश्टर स्केलचा आफ्टरशॉक या भागात बसला, त्यानंतर 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

- Advertisement -

चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने सांगितले की, भूकंपाचे केंद्र चीनलगतच्या सीमेपासून सुमारे 82 किमी अंतरावर होते. झिजियांग प्रदेशाच्या पश्चिमेकडील काशगर आणि आर्टक्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे या केंद्राने म्हटले आहे.

दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के
बुधवारी दुपारी दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.8 इतकी होती. याचे केंद्र नेपाळमधील जुम्लापासून 69 किमी अंतरावर होते. मात्र, दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के सौम्य जणवले. सुदैवाने यात जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. त्याआधी, गुजरात सीमावर्ती भागात राशा, रघतविहीर, फणसपाडा येथे शनिवारी (दि.१८) व रविवारी (दि.१९) तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते.

तुर्कीत भूकंपामुळे हाहाकार
तुर्कस्तान आणि शेजारील सीरियामध्ये 6 फेब्रुवारी भूकंपामुळे हाहाकार माजला होता. या दोन देशांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 मोजली गेली. या भूकंपात 41 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. नंतरच्या एक-दोन दिवसात अनेक वेळा भूकंपाचे आणखी सौम्य धक्के जाणवले.

- Advertisment -